गोंदिया,
Tiger attack शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी जंगल शिवरात गेलेल्या युवकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज, शुक्रवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील घुमर्रा बिट अंतर्गत येत असलेल्या कलपाथरी जंगल परिसरात उघडकीस आली. डुलेश्वर(छोटू) संतोष खरकाटे (31) रा. कलपाथरी असे मृताचे नाव आहे.
Tiger attack नवेगाव-नागझिरा बफर क्षेत्र घोषीत झाल्यानंतर गोरेगाव प्रादेशिक वन परिक्षेत्राचे विभाजन करण्यात आले असून काही भाग सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्या बफर क्षेत्रात तर काही भाग आमगाव वन विभागाच्या अख्त्यारीत येत आहे. दरम्यान, सदर घटना दोन्ही वनपरिक्षेत्राच्या मध्यभागी घडल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत डुलेश्वर हा सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास शेळ्यांकरीता चारा आणण्यासाठी जंगलात गेला होता. यावेळी दबा धरून असलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याला दुचाकीपासून सुमारे अर्धा किमी अंतरापर्यंत ओढत नेले, यात त्याचा मृत्यू झाला.
मात्र, दुपारपर्यंत घरी परत न आल्याने घरच्यांनी गावकर्यांच्या मदतीने त्याचा शोध घेतला असता, 3.30 वाजताच्या सुमारास जंगलातील एका झुडपात पानांनी झाकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. तर त्याच्या मृतदेहाचा काही भाग वन्यप्राण्याने भक्ष्य केल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच गावकर्यांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती सडक अर्जुनी वन विभागाला देण्यात आली. दरम्यान, सडक अर्जुनीचे वन परिक्षेत्राधिकारी मिथून तरोणे व आमगावचे वनपरिक्षेत्राधिकारी आकरे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून पाहणी केली आहे. याप्रकरणी सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्राधिकारी मिथून तरोणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर घटनेला दुजोरा देत ही घटना आमगाव वनपरिक्षेत्रात येत असल्याचे सांगितले. बातमी लिहीपर्यंत वन विभागातर्फे घटनास्थळाचा पंचनामा व इतर कार्यवाही सुरू होती.