विवेकानंद आश्रमात वृक्षारोपन,विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
हिवरा आश्रम : Tree plantation at Vivekananda Ashram निसर्गाचे रक्षण करतांना निसर्गातील सर्व जैविक, अजैविक घटकांचे संतुलन साधने व त्याव्दारे भविष्यातील मानवसमाजाला स्वच्छ,निर्मळ पर्यावरण उपलब्ध करून देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विकासाला शाश्वत मुल्यांची जोड असणे आवश्यक आहे. निसर्ग आपली गरज भागवू शकतो लोभ नाही. विकासाच्या संकल्पनेला पर्यावरणाची जोड असल्यास हे जग अधिक सुंदर होईल यासाठी पर्यावरण संवर्धन ही लोकचळवळ व्हावी असे उदगार जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी विवेकानंद आश्रमात संत शुकदास कॅरिअर अकॅडमीत विद्यार्थ्यांसमोर बोलतांना व्यक्त केले. ५ जून रोजी जागतिक पर्यावरणदिनानिमित्त त्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. विवेकानंद आश्रम या संस्थेत आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
Tree plantation at Vivekananda Ashram विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हा त्यांचा हक्क आहे. ग्रामीण भागात याप्रकाराची शैक्षणिक सुविधा सुरू करणे ही समाजाची व देशाची सेवा आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थी शिक्षण घेवून बाहेर पडल्यावर सेवेची अनेक क्षेत्र त्याला खुली असतात. राज्यभरातून केवळ शिक्षण नव्हे तर संस्कार,व्यक्तीमत्व विकास व व्यापक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी पालक विद्यार्थ्यांना याठिकाणी शिक्षणासाठी पाठवितात असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले. संस्थेच्या गोशाळेमध्ये सरोगेट मदर सारखी सरोगेट काउ उपलब्ध करून दिल्यास गायींमध्ये दर्जेदार विविध जातीचे भ्रूण प्रत्यारोपन करून दुधाळ जनावरांची नवीन पिढी तयार करता येईल. त्यासाठी संस्थेने पुढाकार घ्यावा.लहान मुलांना निर्भेळ,शुध्द दुध मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्त दुध देणारे वान तयार करावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. आश्रमात आगमन प्रसंगी आश्रमात स्थापित भगवान बुध्द,भगवान महावीर,स्वामी विवेकानंद,संत ज्ञानेश्वर महाराज व प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमांना त्यांनी मालार्पण केले. संस्थेच्या वतीने अध्यक्ष आर.बी.मालपाणी सर यांनी जिल्हाधिकारी व मेहकरचे उपविभागीय अधिकारी दिनेश जोगी यांचे स्वागत केले. याप्रसंगी आश्रमाचे अशोक थोरहाते, संतोष गोरे,नारायण भारस्कर, पुरूषोत्तम आकोटकर, कैलास भिसडे, प्रा.गजानन ठाकरे,दयानंद थोरहाते,राजेश रौंदळकर व मेहकर तहसीलचे कर्मचारी उपस्थित होते.