बंडखोरी थांबवण्यासाठी महायुतीची ‘फुल पॉवर’ मोहीम

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
नाशिक,
Uday Samant नाशिकमधील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अंतर्गत मतभेद आणि बंडखोरीचे चित्र समोर आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरही काही उमेदवारांनी माघार न घेतल्याने राजकीय तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांकडून समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 

Uday Samant  
राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांनीही माघार घेतली आहे. मात्र गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांचे उमेदवारी अर्ज अद्याप कायम आहेत. प्रसाद हिरे यांच्याशी सकाळपासून दोनदा संवाद झाला असून मंत्री दादा भुसे त्यांची भेट घेणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.महायुतीकडून विधान परिषद निवडणूक एकत्रितपणे लढवली जात असली तरी नाशिक मतदारसंघात निर्माण झालेल्या बंडखोरीमुळे पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) कडून उदय सामंत आणि भारतीय जनता पक्षाकडून गिरीश महाजन हे समन्वय साधण्यासाठी सक्रिय झाले आहेत.
 
 
उदय सामंत यांनी सांगितले की, गोकुळ गीते यांना वैयक्तिकरित्या विनंती करण्यात आली आहे. तसेच गिरीश महाजन हे जळगावहून नाशिकमध्ये दाखल झाले असून पुढील काही तासांत ते गणेश गीते आणि गोकुळ गीते यांची भेट घेणार आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना या दोन्ही उमेदवारांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, गोकुळ गीते यांनी आपण माघार घेणार नसल्याची भूमिका घेतली असून आपण कोणत्याही पक्षाचे सदस्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी कोणीही उमेदवारांवर दबाव आणू नये, अशी भूमिका मांडली. आपण गीते यांच्याशी चर्चा केली असून त्यांना विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
महायुतीतील समन्वयाबाबत बोलताना Uday Samant  सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची भूमिका अधोरेखित केली. पक्षांतर्गत अडचणी निर्माण झाल्यास दबाव आणण्यापेक्षा संवादातून तोडगा काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गिरीश महाजन यांच्याबाबत चुकीचा संदेश जाऊ नये, याचीही काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राजकीय मतभेद आणि गैरसमज हे तात्पुरते असून योग्य संवादातून ते दूर होतील, असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला. महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावा, हीच सर्व नेत्यांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असली तरी बिनशर्त पाठिंबा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नाशिकमधील या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली असून पुढील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.