गोळीबार प्रकरणातील फिर्यादीवरच गुन्हा दाखल

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
उल्हासनगर,
kailash-colony-double-murder : उल्हासनगरातील गाजलेल्या कैलास कॉलनी दुहेरी हत्याकांड प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला गोळीबाराची तक्रार करणारा दीपक ठाकूर हाच आता या प्रकरणात आरोपी ठरला असून त्याच्यासह आठ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपासात गोळीबाराच्या घटनेपूर्वी मुख्य आरोपी अजय राव याला रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
 
 

firing
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी रात्री अजय राव आणि त्याचा मित्र अभय विश्वकर्मा हे दोघे मोटारसायकलवरून जात असताना कैलास कॉलनी परिसरात काही जणांनी त्यांना अडवले. त्यानंतर दोघांना जबरदस्तीने खाली खेचून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अजय राववर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला होता. तसेच त्याच्या मोटारसायकलीचीही तोडफोड करण्यात आल्याचा आरोप आहे.
 
या घटनेनंतर काही वेळातच गोळीबाराची घटना घडली होती. सुरुवातीला या प्रकरणात दीपक ठाकूर हा पीडित म्हणून समोर आला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात मारहाण आणि गोळीबार या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी दीपक ठाकूर आणि त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला.
 
पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, जुन्या वैमनस्यातून या घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे मारहाण आणि गोळीबार या दोन्ही घटनांचा एकत्रित तपास करण्यात येत आहे. या दुहेरी हत्याकांडामागील संपूर्ण कट, त्यातील सहभागी आरोपी आणि त्यांच्या भूमिकेचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
 
या नव्या घडामोडीमुळे कैलास कॉलनी दुहेरी हत्याकांडाला नवे वळण मिळाले असून, सुरुवातीला फिर्यादी म्हणून समोर आलेल्या व्यक्तीवरच गंभीर आरोप झाल्याने उल्हासनगरमध्ये या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.