गोरस भंडारचे उत्पादन व विक्री केंद्रं तत्काळ सुरू करा
वर्धा,
Wardha: Goras Bhandar गोरस भंडार ही वर्धेच्या सहकार चळवळीतील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित संस्था आहे. सन १९३८ पासून शेतकरी, उत्पादक, कर्मचारी, वितरक आणि ग्राहक यांना जोडणारी एक महत्त्वाची लोकाभिमुख व्यवस्था म्हणून कार्यरत आहे. गोरस पाकसह विविध उत्पादने वर्धेची ओळख देशभर पोहोचवत आहेत. या महत्त्वपूर्ण संस्थेवर कोणतीही पूर्वसूचना, संवाद किंवा सुधारणा करण्याची पुरेशी संधी न देता करण्यात आलेली एकतर्फी प्रशासकीय कारवाई अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. गोरस भंडार पुर्ववत सुरू करण्यात यावा या मागणीसाठी गोरस भंडार बचाव नागरी समितीच्या वतीने आज ५ रोजी दुपारी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनानुसार, प्रशासनाचे कर्तव्य संस्था बंद करणे नसून, त्रुटी दूर करून त्या अधिक सक्षमपणे कार्यरत राहतील यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणे हे आहे. गोरस भंडारमधील संपूर्ण उत्पादन व विक्री व्यवस्था ठप्प झाल्यामुळे आर्थिक व्यवहार थांबले आहेत.
Wardha: Goras Bhandar शेतकरी, कामगार व वितरक यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. स्थानिक अर्थव्यवस्था व सहकार चळवळीला मोठा धक्का बसला आहे. ग्राहकांच्या विश्वासावर परिणाम होण्याची शयता निर्माण झाली आहे. आवश्यक सुधारणा व नियमपालनासाठी वाजवी मुदत देण्यात यावी. गोरस भंडारचे उत्पादन, वितरण व विक्री केंद्रे तात्काळ सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. कोणतीही पुढील कारवाई करण्यापूर्वी संबंधित घटकांशी संवाद साधण्यात यावा. लोकांच्या विश्वासावर उभी असलेली आणि जवळपास शतकभराची परंपरा जपणारी ही संस्था बंद होणे हे वर्धेच्या सामाजिक व आर्थिक हितासाठी घातक ठरेल. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ सकारात्मक व न्याय्य निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गोरस भंडारचे कार्य पूर्ववत सुरू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. मोर्चात नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, काँग्रेसचे नेते डॉ. अभ्युदय मेघे, गांधीवादी अविनाश काकडे यांच्या नेतृत्वात काढलेल्या मोर्चात शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरिक सहभागी झाले होते.