वर्धा नदीच्या खाेऱ्यात सापडल्या वाकाटककालीन पाऊलखुणा

शाेधयात्रेदरम्यान सापडला अमुल्य ठेवा

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
wardha-river : निसर्गसंपन्न वर्धा नदीच्या खाेऱ्यात प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचा अमूल्य ठेवा दडला असल्याचे वेध प्रतिष्ठानद्वारे आयाेजित ‘वर्धा नदी शाेधयात्रे’दरम्यान उघड झाले आहे. नदीकाठच्या विविध ऐतिहासिक स्थळांना भेट देताना शाेधयात्रींना अनेक महत्त्वपूर्ण पुरातत्त्वीय अवशेष आणि इतिहासाच्या पाऊलखुणा पाहायला मिळाल्या.
 
 
 
wardha-shodhayatra
 
 
 
शाेधयात्रेदरम्यान वर्धा नदीच्या तीरावरील चिचंडा गावाजवळ उभारण्यात येत असलेल्या धरण परिसराला भेट देण्यात आली. याच परिसरातील उंच टेकडीवर वसलेला शेरगड दुर्ग इतिहासप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरला. गाेंड राजवटीत उभारण्यात आलेला आणि नंतर माेगल सरदार शेरखान याने पुनर्बांधणी केलेला हा दुर्ग आजही आपल्या वैभवशाली भूतकाळाची साक्ष देत उभा आहे.
 
सुमारे दाेन एकर परिसरात विस्तारलेल्या या किल्ल्यावर महादरवाजा, राजवाड्याचे दगडी प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज, पाण्याचा हाैद तसेच राजनिवासाचे भग्नावशेष आजही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या माथ्यावरून परिसरातील डाेंगररांगा, घनदाट वनक्षेत्र आणि वर्धा नदीचे खडकाळ पात्र यांचे नयनरम्य दर्शन घडते. महादरवाज्याखालील सपाट भागात शेरखानचा भव्य मकबरा असून पायथ्याशी मारुती मंदिरही आहे. मात्र, पुरेशी देखरेख आणि संवर्धनाअभावी हा ऐतिहासिक दुर्ग माेडकळीस येत असल्याची खंत शाेधयात्रींनी व्यक्त केली. या शाेधयात्रेत पुरातत्त्व अभ्यासक डाॅ. मनाेहर नरांजे, खुशाल कापसे, डाॅ. अश्विन किनारकर, डाॅ. लाेकेश तमगिरे, ओंकार पाटील, घनश्याम भडांगे यांच्यासह अनेक अभ्यासक सहभागी झाले आहेत.
प्रभात पट्टनमध्ये वाकाटककालीन वारशाचे दर्शन
 
 
शेरगडनंतर शाेधयात्रेचा ताा वर्धा नदी खाेऱ्यातील प्रभात पट्टन या ऐतिहासिक स्थळी पाेहाेचला. वाकाटक राजवंशाशी संबंधित ताम्रपट याच परिसरात प्राप्त झाल्याने या स्थळाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक रहिवासी दिलीप घाेरे यांनी गावातील पुरातत्त्वीय संपदेची माहिती देताना स्वतःच्या संग्रहातील प्राचीन जाते शाेधयात्रींना दाखविले. तसेच परिसरातील प्राचीन अवशेष आणि इतिहासाबाबत सविस्तर माहिती दिली