छतरपूर,
Wife kills husband with a stick मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकीच संवेदनशील घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीची काठीने मारहाण करून हत्या केल्यानंतर काही तास मृतदेहाजवळ बसून राहिल्याची माहिती आहे. त्यानंतर तिने जवळच्या मंदिरात जाऊन देवासमोर क्षमा मागितली आणि नंतर थेट पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
नीलम कुशवाहा असे या महिलेचे नाव असून, तिचा पती दीनदयाळ कुशवाहा याच्यासोबत तिचे गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, नीलम गेल्या चार वर्षांपासून आपल्या माहेरी राहत होती. १ जून रोजी दीनदयाळ दारूच्या नशेत तिच्या माहेरी आला आणि तिथेच दोघांमध्ये वाद झाला. परिस्थिती इतकी गंभीर झाली की वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. नीलमचा आरोप आहे की तिच्या पतीने दारूच्या नशेत घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या मुलाला उलटे टांगले होते. या प्रकारामुळे ती घाबरली आणि संतापाच्या भरात तिने जवळची काठी उचलून पतीवर हल्ला केला. हल्ल्यात दीनदयाळ खाली कोसळल्यानंतरही मारहाण सुरू राहिली आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर नीलम सुमारे आठ तास मृतदेहाजवळ बसून राहिली. त्यानंतर ती जवळच्या मंदिरात गेली आणि काही वेळ देवासमोर बसून क्षमा मागितली. यानंतर ती थेट पोलीस ठाण्यात गेली आणि स्वतःहून घडलेला प्रकार सांगत आत्मसमर्पण केले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, नेमक्या परिस्थितीचा आणि घटनेमागील कारणांचा पोलीस तपास करत आहेत.