'एक झाड आईच्या नावाने' द्वारे पृथ्वीच्या भविष्यासाठी हरित संकल्प’

- कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांचे पर्यावरण संवर्धनाचे आवाहन

    दिनांक :05-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
world-environment-day : विश्व पर्यावरण दिनानिमित्त कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत बकुळाच्या रोपट्याचे वृक्षारोपण करण्यात आले. विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला. यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने सक्रिय योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
 
 
ngp
 
 
यावेळी बोलताना डॉ. वैद्य म्हणाले की, पर्यावरण संरक्षण ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज आहे. वाढते तापमान, पाण्याची टंचाई, जंगलांचा ऱ्हास आणि बदलते हवामान यामुळे निसर्गाचे महत्त्व अधिक तीव्रतेने जाणवत आहे. त्यामुळे पर्यावरणस्नेही जीवनशैली स्वीकारून निसर्गाची हानी होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
 
‘शतपुत्रसमो द्रुमः’ या उक्तीचा संदर्भ देत त्यांनी वृक्षांचे समाजजीवनातील महत्त्व अधोरेखित केले. केंद्र सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानाचा उल्लेख करत त्यांनी केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संगोपन आणि संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. जन्मदात्या आईच्या नावाने लावलेले झाड हे मातृरूप पृथ्वीच्या हिरव्यागार, सकस आणि निरोगी अस्तित्वासाठी मोलाचे योगदान ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.
 
या प्रसंगी शिल्पा वैद्य, योगतज्ज्ञ ज्योती तुंडुलवार, अधिष्ठाता प्रा. कविता होले, प्रा. कलापिनी अगस्ती, प्रा. प्रसाद गोखले, कुलसचिव डॉ. रोशन अलोने, जनसंपर्क अधिकारी डॉ. रेणुका बोकारे यांच्यासह विद्यापीठातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.