अंबड (जि. जालना),
young-woman-dies-during-training : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचा सरावादरम्यान खदानीतील खोल पाण्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, निष्काळजीपणाचा ठपका ठेवत खदानीचे संचालक आणि प्रशिक्षक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रीती काशीराम भाकड (वय १९) असे मृत तरुणीचे नाव आहे. लहानपणापासून पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगलेल्या प्रीतीने त्यासाठी कठोर परिश्रम सुरू ठेवले होते. नेहमीप्रमाणे ती सरावासाठी अंबड शहरालगतच्या वळवंडा शिवारातील एका पाण्याने भरलेल्या खदानीच्या परिसरात गेली होती. तेथे प्रशिक्षक आणि संचालक यांच्या उपस्थितीत सराव सुरू होता.
सरावादरम्यान अचानक प्रीतीचा तोल गेला आणि ती खदानीतील खोल पाण्यात पडली. तिच्या मदतीसाठी उपस्थितांनी तातडीने प्रयत्न केले. काही जण पाण्यात उतरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र खदानीतील पाणी खोल असल्याने आणि वेळेत बचावकार्य पूर्ण न झाल्याने प्रीतीचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने प्रीतीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत संबंधित खदानीचे संचालक आणि प्रशिक्षक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे प्रीतीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अंबड परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.