ब्राह्मण गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा
यवतमाळ,
Yuva Brahmin Sangh बँकिंग क्षेत्र हे युवकांसाठी एक अतिशय मोठे आणि उज्ज्वल क्षेत्र आहे. यामध्ये अधिकाधिक ब्राह्मण युवकांनी सहभागी व्हावे आणि आपले करिअर घडवावे, असे मार्गदर्शन अरविंद देशपांडे यांनी केले. युवा ब्राह्मण संघाच्या वतीने आयोजित ब्राह्मण गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. उदय नावलेकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजीवजोशी, युवा ब्राह्मण संघाचे अध्यक्ष परीक्षित शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. अखिल ब्राह्मण समाजाचे आराध्यदैवत भगवान परशुराम, विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
पुढे मार्गदर्शन करताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे म्हणाले, सरकारी बँकांसोबतच विविध सहकारी बँका व मोठ्या संख्येने या क्षेत्रात उघडणाऱ्या खाजगी बँकांमध्ये युवकांकरता नोकरीची उत्तम संधी उपलब्ध आहे. अधिकाधिक युवकांनी यामध्ये आपले करिअर करावे. प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. उदय नावलेकर यांनीसुद्धा याप्रसंगी यथोचित मार्गदर्शन केले. यानंतर बहुभाषिक ब्राह्मण समाजातील दहावी, बारावी सोबतच पदवीधर आणि विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या मिश्रा, प्रास्ताविक प्रदेश युवा सरचिटणीस राम साकळे, सत्काराचे सूत्रसंचालन राधा कुलकर्णी व वैष्णवी वेळूकर यांनी केले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Yuva Brahmin Sangh या प्रसंगी प्रामुख्याने ब्राह्मण महासंघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय त्रिवेदी, जिल्हा सचिव सुधीर देशपांडे, महिला आघाडी शहराध्यक्ष अनुजा व्यास, यशवंत पाटील, अॅड. प्रदीप पांडे, आनंद गंजीवाले, संजय दंडे, प्रशांत परसोडकर यांच्यासह ज्ञाती बंधू भगिनी आणि गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता युवा ब्राह्मण संघाचे सचिव शंतनू जोशी, अश्विन मोहदरकर, आदिनाथ राखे, प्रथमेश शास्त्री, वेदेश केळापुरे, तेजश्री वैद्य, अश्विनी जोशी, प्रीती पंचभाई यांनी विशेष परिश्रम घेतले.