सीबीएसईकडून १२वी पुनर्मूल्यांकनासाठी मुदतवाढ

    दिनांक :06-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
CBSE extends deadline for revaluation केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिका पडताळणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला असून आता हे पोर्टल ७ जूनपर्यंत खुले राहणार आहे. मंडळाने यापूर्वी पुनर्मूल्यांकनासाठी ६ जून ही अंतिम तारीख निश्चित केली होती. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी पोर्टलवर लॉगिन, उत्तरपत्रिका पाहणे तसेच शुल्क भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्यानंतर ही मुदत वाढवण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना अतिरिक्त २४ तासांचा वेळ देण्यात आला असून अर्ज प्रक्रिया ७ जून मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.
 
 
revaluation
 
सीबीएसईकडून याबाबत माहिती देताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे, जेणेकरून कोणताही विद्यार्थी तांत्रिक अडचणींमुळे वंचित राहू नये. मंडळाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्येही ही घोषणा करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ७०,४३३ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला आहे. यामध्ये ७,३१४ विद्यार्थ्यांनी गुण पडताळणीसाठी तर ६३,११९ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर केला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरही पोर्टलच्या तांत्रिक समस्यांबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या.
 
 
सीबीएसईने विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत (फोटोकॉपी) घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच ते उत्तरपत्रिकेतील चुका तपासणीसाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. या प्रक्रियेत मिळणारे गुण हे अंतिम मानले जातील आणि त्यानंतर कोणतीही पुनर्विचार अथवा अपील स्वीकारले जाणार नाही, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. पुनर्मूल्यांकनानंतर जाहीर होणारा निकाल अंतिम आणि बंधनकारक असेल.