पुलगावात औद्योगिक वसाहतीची मागणी

    दिनांक :06-Jun-2026
Total Views |
पुलगाव,
Pulgaon दिवसेंदिवस शहरात बेरोजगारीची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे शहर आणि लगतच्या सरकारी पडीत जमिनीचा वापर करून एमआयडीसी उभारण्यात यावी, त्यातून बेरोजगारांना काम मिळवून द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी युवा आणि वरिष्ठ मंडळी एकवटली असून पुलगाव शहरात औद्योगिक वसाहतीची मागणी केली. पुलगाव विकास समितीने इंटक भवनात ५ रोजी आयोजित पत्रपरिषदेत बेरोजगारीच्या मुद्यावर बोट ठेवून अन्य मागण्याही रेटून धरल्या.
 
 
Pulgaon
 
पुलगाव येथील औद्योगिक वसाहत भाग २ आणि पुलगाव येथील बंद असलेली पुलगाव कॉटन मिल सुरू करून पुलगावात उद्भवत असलेली बेरोजगारीची समस्या दूर करावी, या प्रमुख मागणीसह खाजगी क्षेत्रातील कामगारांसाठी ईपीएस ९५ पेन्शन योजना लागू करून त्यांना सन्मानजनक पेन्शन देण्यात यावी, सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींसाठी मानधन योजना सुरू करण्यात यावी, उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात येऊन नागरिकांना दिलासा द्यावा, पुलगाव आणि लगतच्या गुंजखेडा, लक्ष्मीनारायणपूर, मलकापूर येथील सरकारी पडीत जमिनीचा वापर करून एमआयडीसी भाग २ हे उभारण्यात येऊ शकते, हा मुद्दाही उपस्थित केला. आ. राजेश बकाने आणि माजी आ. रणजित कांबळे यांनी सुद्धा प्रयत्न करून पुलगाव येथील बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी राजकीय हेवेदावे विसरून योगदान दिल्यास मोठी समस्या काही दिवसातच दूर होऊ शकते, अशी मागणीही समितीच्या वतीने करण्यात आली.
 
 
रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न सुरू : आ. बकाने
यासंदर्भात आ. राजेश बकाने यांची प्रतिक्रिया घेतली असता, ते म्हणाले की, पुलगाव कॉटन मिल बंद करण्यात सर्वात मोठे पाप काँग्रेस नेत्याचे असून फत १ रुपयात कॉटन मिलची जमीन प्रभा राव यांनी बोगस व्यापार्‍याला विकून पुलगाव येथील उद्योग बंद पाडण्याचे कृत्य केले. मात्र, आम्ही त्या गिरणीला पुन्हा सुरू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहोत. औद्योगिक वसाहतकरिता सलग ७५० एकड जमीन हवी असून ती भिडी परिसरात उपलब्ध आहे. गुंजखेडा, लक्ष्मीनारायणपूर येथील जमिनीचा प्रस्ताव सुद्धा शासन दरबारी पाठवलेला आहे. दोन्हींपैकी जी शासनाच्या निकषामध्ये बसेल तेथे औद्योगिक वसाहत निर्माण करून पुलगाव आणि परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही आ. बकाने यांनी सांगितले.