समुद्रपूर,
seed festival जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मगन संग्रहालय समितीच्या नैसर्गिक शेती विकास केंद्रात आयोजित ‘बीजोत्सव २०२६’ उत्साहात पार पडला. कृषी संस्कृती विचार प्रेरणा मंथन या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात ३० गावांतील दोनशेहून अधिक शेतकरी, महिला, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी, बीज उत्पादक, बीज संवर्धक व बीजमाता सहभागी झाल्या होत्या. मगन संग्रहालय समितीच्या प्रात्यक्षिक क्षेत्रावर आंब्याच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे संचालक अपूर्व देशपांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी हर्षदा खेकरे, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी प्रवीण देशमुख महाराज, शोभा गायधने, प्रवीण महाजन, चक्रधर भगत, किशोर भुडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे यांची उपस्थिती होती.

बीजोत्सवानिमित्त शेतकर्यांनी देशी बियाण्यांची प्रदर्शनी व विक्री आयोजित केली होती. मदनी येथील शेतकरी संजय कांबळे यांनी स्वावलंबी जीवनशैलीचा पुरस्कार करत कुटुंबाच्या गरजेच्या वस्तूंची निर्मिती व वापर स्वतः करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कापूस आपला तर कपडाही आपल्या कापसाचा ही संकल्पना मांडत त्यांनी स्वदेशी खादीच्या वापराचे महत्त्व स्पष्ट केले. प्रवीण देशमुख महाराज यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचार कृतीत उतरविल्यास ग्रामीण जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात, असे प्रतिपादन केले.
तालुका कृषी अधिकारी हर्षदा खेकरे यांनी सलग २० वर्षे अविरत सुरू असलेल्या बीजोत्सव उपक्रमाचे कौतुक करून शेतकर्यांनी अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे यांनी पर्यावरण संतुलनासाठी बीज, झाडे, कंद व मुळांचे संवर्धन आवश्यक असल्याचे सांगितले. किशोर भुडे यांनी नैसर्गिक शेतीमुळे झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव मांडले, तर चक्रधर भगत यांनी भविष्यातील शेती, संशोधन व नवतंत्रज्ञानाच्या स्वीकारावर मार्गदर्शन केले. यावेळी गौतम कांबळे यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची माहिती दिली. तर प्रास्ताविक करताना केंद्र प्रमुख गजानन गारघाटे यांनी केले. यशस्वीतेसाठी विदर्भ नैसर्गिक शेतमाल उत्पादक शेतकरी कंपनी, समुद्रपूर जैविक शेती मिशन शेतकरी कंपनी, स्वाभिमानी महिला ग्रामसंघ तसेच मगन संग्रहालय समितीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.