काँग्रेसच्या नशिबातील पराभवाचे प्राक्तन

    दिनांक :06-Jun-2026
Total Views |
दिल्ली अग्रलेख
vidhanparishad election देशात सध्या कोणत्याच राज्यात विधानसभेची निवडणूक नाही. त्यामुळे राज्यसभेच्या तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा जोरात आहे. आपल्याकडे दोन पद्धतीने निवडणुका होतात, एक म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक आणि दुसरी म्हणजे अप्रत्यक्ष निवडणूक. लोकसभा आणि विधानसभेसाठी होतात, ती प्रत्यक्ष निवडणूक आणि विधानपरिषद आणि राज्यसभेसाठी होते, ती अप्रत्यक्ष निवडणूक. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेसाठीही प्रत्यक्ष निवडणूक होते. प्रत्यक्ष निवडणुकीत सर्वसामान्य जनता मतदान करीत आपले लोकप्रतिनिधी निवडते. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत जनता थेट मतदान करत नाही तर जनतेने आधीच्या निवडणुकीत म्हणजे विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मतदान करीत असतात. विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघात शिक्षक तर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पदवीधर युवक मतदान करीत असतात. विधानसभा निवडणुकीत एक लाखापासून पाच लाखापर्यंत मतदार असतात तर लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्या 25 ते 30 लाखांपर्यंत असते. त्यामुळे या निवडणुका नेहमीच चुरशीच्या होतात.
 
 

congress 
 
 
विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत मतदारांची संख्या मर्यादित असते. कोणत्या पक्षाचे किती मतदार आहे, ते ठरलेले असते. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाची आधीच सगळ्यांना कल्पना आलेली असते. सामान्यपणे विधानपरिषदेची असो की राज्यसभेची; या निवडणुका बहुतांश अविरोध होत असतात. फार कमी वेळा त्यात निवडणुकीची म्हणजे मतदानाची वेळ येते. निवडणूक विधानसभेची असो की लोकसभेची, त्यात पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. एकवेळ उन्हाळ्यात आपण पाणी जपून वापरू, पण निवडणुकीत पैसा जपून वापरता येत नाही. तो पाण्याच्या प्रवाहापेक्षा जास्त वेगाने सोडावा लागतो. काही वर्षे आधीपर्यंत विधानपरिषद वा राज्यसभेच्या निवडणुकीला एक रुपयाही लागत नव्हता. कारण अशा निवडणुकीत प्रचार करण्याची गरजच पडत नव्हती. आता मात्र या दोन्ही निवडणुका अतिशय महागड्या होत चालल्या आहेत. विधानपरिषद वा राज्यसभा निवडणुकीत जास्तीत जास्त 100-200 मतदार असतात. त्यात एका जागेसाठी 35-40 मतदारांची गरज असते. या निवडणुकाही आता पैशाच्या झाल्या आहेत.
 
हे सगळे रामायण आठवण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 17 तर राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होत आहे. विधानपरिषदेच्या 17 पैकी 6 जागांवरील उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. आता उर्वरित 11 जागांसाठी 18 जूनला मतदान होणार आहे. फक्त भाजपाचेच उमेदवार अविरोध विजयी झाले नाही तर शिवसेना शिंदे गटाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवारही अविरोध विजयी झाले आहेत. अविरोध विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये भाजपाचे अरुण लखानी, प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनिकेत तटकरे, विक्रम काकडे तसेच शिवसेना शिंदे गटाचे दुष्यंत चतुर्वेदी आणि रवींद्र फाटक यांचा समावेश आहे. म्हणजे महायुतीतील तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. एखादी निवडणूक अविरोध होणे यात काही गैर नाही. पण निवडणूक अविरोध होण्यासाठी बळाचा वापर केला जात असेल, धमक्या दिल्या जात असतील वा पैशाचे वा अन्य कशाचे आमिष दाखवले जात असेल तर ते योग्य नाही. एखाद्याला तुम्ही जसे निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही, तसेच त्याला निवडणूक लढण्यासाठी बाध्यही करू शकत नाही. आधी एखाद्याने उमेदवारी अर्ज भरला असेल आणि नंतर निवडणूक लढण्याची त्याची इच्छा नसेल तर तो रिंगणातून माघार घेऊ शकतो. निवडणुकीच्या रिंगणातून स्वेच्छेने तो माघार घेत असेल तर तो त्याचा अधिकार आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही काही उमेदवार अविरोध विजयी झाले आहेत. महाराष्ट्रात विधानपरिषदेवर जे अविरोध निवडून आले, त्यात बहुतांश राजकीय घराण्यातील आहेत; याला योगायोग कसा म्हणता येईल? अनिकेत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र आहेत. विक्रम काकडे माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र आहेत. शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र आहेत. प्राजक्त तनपुरे यांची पृष्ठभूमीही राजकीय घराण्याची आहे. या सर्वांच्या अविरोध विजयासाठी त्यांच्या पिताश्रींनी काही प्रयत्न केले नसतील असे नाही. विशेष म्हणजे तसे करण्यात काही गैरही नाही. फक्त हे प्रयत्न करताना कोणत्याही गैरमार्गाचा उपयोग केलेला नसावा.
अरुण लखानी यांचे घर अनेक पिढ्यांपासून संघ आणि भाजपाचे असले, तरी त्यांच्या घराण्यातील कोणी प्रत्यक्ष राजकारणात नव्हते. अरुण लखानी आधी संघाचे स्वयंसेवक तसेच भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. भाजपात कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा न ठेवता पडद्याआडून पक्षाच्या विस्तारासाठी काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत, अशांची उपरोधाने सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते म्हणून टिंगलटवाळी केली जाते. अरुण लखानी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे काम करीत आहेत. त्यांना यावेळी संधी देत निष्ठावान कार्यकर्त्यांवर पक्षात कधीच अन्याय होत नाही, हे भाजपाच्या नेतृत्वाने दाखवून दिले आहे. ‘भगवान के देर अंधेर नहीं’ असे म्हटले जाते; भाजपातही निष्ठावंत कार्यकर्त्यांची कदर केली जाते, त्याला वाèयावर सोडले जात नाही, यात शंका नाही. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना विधानसभा आणि लोकसभेसोबत विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीतही संधी दिली आहे. यासाठी भाजपाच्या राज्यस्तरावरील तसेच केंद्रीय नेतृत्वाचे अभिनंदन केले पाहिजे.
निवडणूक कशी लढवावी हे जसे भाजपाकडून शिकण्यासारखे असते, तसेच निवडणूक कशी लढवू नये, हे विरोधी पक्षांकडून विशेषतः काँग्रेस पक्षाकडून शिकण्यासारखे आहे. कारण ज्या उमेदवारांनी माघार घेतली, त्यातील बहुतांश काँग्रेसचे आहेत. यातील अनेकांनी तर आपल्या पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेतृत्वास विश्वासात न घेताच माघार घेत महायुतीतील अर्धा डझन उमेदवारांच्या अविरोध निवडीचा मार्ग प्रशस्त केला. एका राज्यातील निवडणूक संपत नाही तोच भाजपा नेतृत्व दुसèया राज्यातील निवडणुकीच्या तयारीला लागते. मग त्या राज्यातील निवडणुकीला दीड-दोन वर्षाचा कालावधी असला, तरी भाजपा त्या राज्यात आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावत असते.vidhanparishad election याच्या उलट एका राज्यातील निवडणूक संपली की, काँग्रेसचे नेते ढाराढूर झोपून जातात. काँग्रेसचे नेतेच झोपी गेल्यामुळे कार्यकर्त्यांनी तरी जागून काय करायचे? त्यामुळे तेसुद्धा जागा पाहून आपली पथारी पसरतात. संबंधित राज्यातील निवडणुकीची घोषणा झाल्यावरच काँग्रेसच्या नेत्यांना जाग येते; पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
भाजपाला अनेक राज्यात जो दणदणीत विजय मिळतो, त्याचे कारण त्या पक्षाच्या या तयारीत असते, तर काँग्रेसचा जो दारुण पराभव होतो, त्याचे कारण त्या पक्षाच्या नेत्यांच्या ढाराढूर झोपण्यात दडले आहे, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. मग आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्याशिवाय काँग्रेसला पर्याय राहात नाही. यातून आपल्या पराभवासाठी आपली उदासीनता आणि निष्क्रियता कारणीभूत नाही तर ईव्हीएममुळे आपला पराभव झाला याचे नसलेले मानसिक समाधान काँग्रेसच्या नेत्यांना मिळत असते. आपल्यावरील दोषाचे खापर दुसèयावर फोडण्यात काँग्रेसच्या नेत्यांचा कोणी ‘हात’ धरत नाही. काँग्रेसच्या नेत्यांची स्थिती वर्षभर अभ्यास न करता परीक्षेत नापास होणाèया विद्यार्थ्यांसारखी आहे, जो पेपर कठीण आला म्हणून रडत असतो. हा विद्यार्थी पेपर कठीण आल्यामुळे नाही तर अभ्यास न केल्यामुळे नापास झालेला असतो. पेपर सोपा आला असता तरी तो नापासच झाला असता. कारण सोपा पेपर सोडवायलाही थोडा अभ्यास करणे आवश्यक असते. विधानपरिषदेच्या उर्वरित 11 जागांसाठी होणाèया निवडणुकीत काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. सर्व 11 जागांवर त्यांचा पराभव अटळ आहे. निवडणुकीच्या आखाड्यातील भाजपासारख्या पहेलवानाला पराभूत करायचे असेल तर समोरचा पहेलवानही तेवढ्याच तयारीचा आणि तोलामोलाचा लागत असतो. काडी पहेलवान काही कामाचे नसतात. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांची स्थिती अशा काही पहेलवानांसारखी झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नशिबात पराभवाशिवाय काही येणे शक्यच नाही. काँग्रेसला आता आपल्या पराभवाची एवढी सवय झाली आहे की त्यांना एखादवेळी चुकीने मिळालेल्या विजयाचा धक्का बसतो. कोणाचे नशीब जसे बदलता येत नाही, तसेच काँग्रेसच्या नशिबातील पराभवाचे प्राक्तनही कधीच बदलता येत नाही, येणार नाही.
---