गडचिरोली,
Zilla Parishad Gadchiroli इयत्ता दहावी व बारावीच्या मार्च 2027 मध्ये होणार्या राज्य मंडळाच्या परीक्षांसाठी सध्या कार्यान्वित असलेल्या परीक्षा केंद्रांची पुनर्रचना करून त्यांची संख्या कमी करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेता विद्यमान परीक्षा केंद्रे बंद करू नयेत, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केली आहे. याबाबतचे निवेदन विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर विभाग यांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद गडचिरोली यांच्यामार्फत सादर करण्यात आले.
शासनाने 18 मे 2026 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार इयत्ता दहावीसाठी 300 ते 400 आणि इयत्ता बारावीसाठी 400 ते 500 विद्यार्थी संख्या असलेली परीक्षा केंद्रे पुनर्रचित करण्याचे नियोजन केले आहे. या निकषांच्या अंमलबजावणीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 60 विद्यमान परीक्षा केंद्रे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गडचिरोली हा डोंगरदर्या, नद्या व घनदाट जंगलांनी व्यापलेला दुर्गम जिल्हा आहे. अनेक गावांमध्ये दळणवळणाच्या सुविधा मर्यादित असून विद्यार्थ्यांना एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी मोठा प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत परीक्षा केंद्रांची संख्या कमी झाल्यास विद्यार्थ्यांना 10 ते 15 किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतराचा प्रवास करावा लागू शकतो.
Zilla Parishad Gadchiroli गडचिरोली जिल्ह्याच्या विशेष परिस्थितीचा विचार करून विद्यमान परीक्षा केंद्रांची संख्या कायम ठेवावी व कोणतेही कार्यान्वित परीक्षा केंद्र बंद करू नये, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन सादर करताना अजय लोंढे, मुकुंद म्हशाखेत्री, मुरलीधर कवाडकर, धर्मेंद्र मुनघाटे, नरेंद्र भोयर, मनोज निंबार्ते, यादव बानबले, एम. डी. नागोसे, नुरेश नवघडे, गयाली आणि सौरभ हटवार उपस्थित होते.