खान सरांवर संकटांचे दुहेरी सावट!

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
पाटणा,
Khan Sir प्रसिद्ध शिक्षक आणि ‘खान ग्लोबल स्टडीज’ (केजीएस) या कोचिंग संस्थेचे संचालक फैसल खान उर्फ खान सर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कोचिंग संस्थेबाहेर झालेल्या गोळीबार आणि तोडफोड प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांनी आत्मसमर्पण करण्याऐवजी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
 
Khan Sir
 
खान सरांचे वकील अरविंद कुमार महूआर यांनी सांगितले की, अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज नियमानुसार सोमवारी न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे खान सर तत्काळ आत्मसमर्पण करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे संपूर्ण प्रकरण २ जून रोजी खान ग्लोबल स्टडीज संस्थेबाहेर घडलेल्या गोंधळाशी संबंधित आहे. त्या दिवशी काही अज्ञात व्यक्तींनी संस्थेवर दगडफेक करत तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला होता. याचवेळी गोळीबार झाल्याची माहितीही समोर आली होती. सुरुवातीला खान सरांनी प्रतिस्पर्धी कोचिंग संस्थेचे संचालक रोशन आनंद यांच्यावर या घटनेचा आरोप केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आनंद यांना अटकही केली.
 
मात्र तपास पुढे सरकल्यानंतर वेगळेच चित्र समोर आले. पोलिसांच्या चौकशीत संस्थेच्या सुरक्षारक्षकांनीच गोळीबार केल्याचे उघड झाले. तसेच त्यांनी हा गोळीबार खान सरांच्या सांगण्यावरून केल्याचे कथितरीत्या कबूल केल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी शस्त्र कायद्यासह विविध कलमांखाली खान सरांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक अडचण खान सरांसमोर उभी राहिली आहे. बिहार अग्निशमन विभागाच्या तपासणीत खान ग्लोबल स्टडीज संस्थेमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. तपासादरम्यान अनेक त्रुटी निदर्शनास आल्याने त्या तातडीने दूर करण्याचे निर्देश संस्थेला देण्यात आले आहेत.
 
अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी मनोज कुमार नट यांनी सांगितले की, ठरावीक कालावधीत आवश्यक सुधारणा न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून संस्थेविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये कोचिंग सेंटर सील करण्याचाही पर्याय खुला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गोळीबार प्रकरणातील चौकशी, अटकेची शक्यता आणि अग्निसुरक्षा नियमांवरील कारवाई या तिहेरी संकटामुळे खान सर आणि त्यांच्या संस्थेभोवतीचे संकट आणखी गडद होताना दिसत आहे.