चार-पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा सलोख्याने निपटारा
वाशीम,
Alimony dispute case न्यायप्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि ‘न्याय आपल्या दारी’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने ‘समाधान समारोह’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आणि सामोपचाराच्या माध्यमातून निपटारा करण्यावर भर देण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या विजय तेजराव उगले विरुद्ध जिल्हाधिकारी वाशीम व इतर या प्रकरणात दत्तक मुलगा विजय तेजराव उगले यांनी त्यांच्या आई केशरबाई तेजराव उगले व बहीण लताबाई लक्ष्मण सावळे यांच्याशी संबंधित पोटगीच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
Alimony dispute case यापूर्वी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाविरुद्ध ही अपील करण्यात आली होती. हे प्रकरण वाशीम जिल्ह्यातील असल्याने ‘समाधान समारोह’ उपक्रमांतर्गत सर्वोच्च न्यायालयाने पूर्व समुपदेशनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे पाठविले. त्यानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष अनिल सुब्रमण्यम यांनी संबंधित पक्षकारांचे समुपदेशन करून त्यांच्यातील वाद सामोपचाराने मिटविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. चार ते पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या कौटुंबिक वादाचा निपटारा झाल्यामुळे पक्षकारांचा वेळ, पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेतील श्रम यांची मोठी बचत झाली. तसेच पक्षकारांमधील संबंधही पूर्ववत होण्यास मदत झाली आहे. या प्रकरणात वादीच्या वतीने अॅड. वैभव एम. तिफणे तर प्रतिवादीच्या वतीने अॅड. सुरेश के. लबडे यांनी कामकाज पाहिले. वाद आपसी संमतीने निकाली निघाल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही. जी. चौखंडे यांनी संबंधित पक्षकारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ‘समाधान समारोह’ उपक्रमामुळे न्यायालयीन वाद सामोपचाराने मिटविण्याचा मार्ग अधिक प्रभावी ठरत असून, न्यायव्यवस्थेवरील ताण कमी करण्याबरोबरच सामाजिक सलोखा वाढविण्यासही मदत होत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.