शिव नाडर विद्यापीठाच्या चोवीस लाखाच्या शिष्यवृत्ती साठी आश्विन ब्राह्मणची निवड
मानोरा,
Ashwin Brahmin तालुक्यातील उज्वलनगर येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील अश्विन ब्राह्मण याने कठोर संघर्ष, जिद्द आणि अथक परिश्रमाच्या बळावर दिल्लीतील प्रतिष्ठित शिव नाडर विद्यापीठाच्या मास्टर ऑफ रुरल मॅनेजमेंट अभ्यासक्रमात १०० टक्के शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळविला आहे. मथुरा लभान या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्टया मागासलेल्या समाजातील बहुतांश कुटुंबे शेती, पशुपालन आणि हात मजुरीवर अवलंबून आहेत. अशा समाजातील आश्विनसाठी उच्च शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता. बारावीनंतर घरची आर्थिक व सामाजिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने त्याच्या शिक्षणात एक वर्षाचा खंड पडला. अनेक अडचणी, भविष्याची चिंता आणि मर्यादित साधनसामग्री असूनही त्याने शिक्षणाची वाट सोडली नाही.
Ashwin Brahmin त्यानंतर त्याने यवतमाळ येथील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयात बॅचलर ऑफ सोशल वर्क अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयातून मिळालेल्या शैक्षणिक प्रेरणा, आत्मविश्वास आणि मार्गदर्शनामुळे आश्विनने स्वतःवरील विश्वास पुन्हा मिळवला आणि मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस केले. समाजकार्याच्या शिक्षणातून त्याने ग्रामीण भागातील समस्या, वंचित समाजाचे प्रश्न आणि विकासाच्या संधी यांचा सखोल अभ्यास केला. शिव नाडर विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेत देशभरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत आश्विनने लेखी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. त्यानंतरच्या कठीण मुलाखतीलाही आत्मविश्वासाने सामोरे जात त्याने आपली गुणवत्ता, सामाजिक क्षेत्रातील अनुभव आणि ग्रामीण विकासाविषयीची बांधिलकी प्रभावीपणे मांडली. ज्या समाजातून उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणेही अनेकांसाठी कठीण असते, त्या समाजातील आश्विन ब्राह्मणने दिल्लीतील शिव नाडर विद्यापीठापर्यंत मजल मारत संघर्षाचे यशात रूपांतर केले आहे. त्याचे यश केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून मथुरा लभान समाज, वाशीम जिल्हा आणि ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संघर्ष मोठा असला तरी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे अश्विनने सिद्ध करून दाखविले. तो आपल्या यशाचे श्रेय आईवडील आणि सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाला देतो.