करिअरचा पासपोर्ट ठरतेय परदेशी भाषा

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
जागतिक करिअरच्या संधींसाठी नव्या भाषांचा अभ्यास
विधी शर्मा

नागपूर, 
Career in Foreign Languages उच्च शिक्षण, परदेशातील रोजगार आणि जागतिक स्तरावरील करिअरच्या संधींचा वेध घेताना शहरातील तरुणाई आता केवळ इंग्रजीपुरती मर्यादित राहिलेली नाही. जर्मन आणि फ्रेंच या पारंपरिक परदेशी भाषांसोबतच जपानी, कोरियन, स्पॅनिश, रशियन आणि मँडरिन चायनीज यांसारख्या भाषांच्या अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसून येत आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार भाषा शिकण्याच्या प्रवाहातही मोठा बदल होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
 

Career 
गेल्या काही वर्षांपर्यंत जर्मन ही विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय परदेशी भाषा मानली जात होती. युरोपमधील उच्च शिक्षण, संशोधन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींमुळे जर्मन भाषेला विशेष मागणी होती. त्याचप्रमाणे शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये समावेश असल्याने फ्रेंच भाषेलाही मोठी पसंती मिळत होती.
आजही जर्मन आणि फ्रेंच या भाषांचे वर्चस्व कायम असले, तरी नव्या पिढीची पावले आता इतर जागतिक भाषांकडेही वळताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, करिअरच्या बदलत्या संधी, विविध देशांतील शिक्षण व्यवस्था आणि जागतिक उद्योगांची वाढती गरज यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषा निवडीमध्ये वैविध्य आले आहे.
- रशियन आणि जपानी भाषांची वाढती लोकप्रियता
वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि एरोस्पेस क्षेत्रात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये रशियन भाषेची मागणी वाढत आहे. तुलनेने कमी खर्चात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या रशियन विद्यापीठांमुळे या भाषेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दुसरीकडे, जपानच्या तंत्रज्ञान, रोबोटिक्स, वाहन उद्योग, अॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रातील नेतृत्वामुळे जपानी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. या क्षेत्रांत करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी जपानी भाषा महत्त्वाचे कौशल्य ठरत आहे.
-स्पॅनिश आणि मँडरिनकडेही ओढ
जगभरात व्यापकपणे वापरली जाणारी स्पॅनिश भाषा बहुराष्ट्रीय कंपन्या, आंतरराष्ट्रीय व्यापार, भाषांतर आणि ग्राहक सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी स्पॅनिश भाषा शिकण्यास प्राधान्य देत आहेत.
त्याचवेळी जागतिक अर्थव्यवस्थेत चीनची वाढती भूमिका लक्षात घेता मँडरिन चायनीज भाषेची मागणीही वाढत आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय, व्यापार आणि आर्थिक सहकार्याच्या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही भाषा महत्त्वाची मानली जात आहे.
- ‘के-पॉप’च्या प्रभावाने कोरियन भाषेलाही मागणी
कोरियन मनोरंजन विश्व, के-पॉप संगीत, वेब सिरीज आणि सांस्कृतिक प्रभावामुळे कोरियन भाषा शिकणाऱ्या तरुणांची संख्याही वाढत आहे. सांस्कृतिक आवड आणि भविष्यातील शैक्षणिक संधी यांचा संगम या वाढत्या मागणीमागे असल्याचे भाषा तज्ज्ञ सांगतात.
Career in Foreign Languages  शहरातील भाषा प्रशिक्षण संस्थांच्या मते, आजचा विद्यार्थी पारंपरिक पर्यायांपलीकडे विचार करत आहे. जागतिक स्तरावर उपलब्ध होणाऱ्या नव्या संधींशी सुसंगत भाषा निवडण्याकडे त्यांचा कल वाढला आहे.
बहुभाषिक कौशल्ये ही आता केवळ छंदाची बाब राहिलेली नसून ती करिअर घडविण्याचे प्रभावी साधन बनली आहेत. बदलत्या जागतिक स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी शहरातील तरुणाई आता नव्या भाषांमधून यशाची नवी दारे उघडत आहे.