"हा तर फक्त ट्रेलर आहे... " सीएम विजय यांचा भ्रष्टाचारावर मोठा हातोडा!

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
चेन्नई,
cm-vijay : तमिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांनी राज्याची सूत्रे हाती घेताच प्रशासनात अत्यंत आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. "हा तर फक्त ट्रेलर आहे... पिक्चर अजून बाकी आहे," असा स्पष्ट संदेश देत मुख्यमंत्री विजय यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध थेट युद्ध पुकारले आहे. त्यांच्या पहिल्याच मोठ्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
 
 
CM
 
 
 
पहिली मंत्रिमंडळ बैठक आणि थेट आदेश शुक्रवारी पार पडलेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री विजय यांनी तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन (TASMAC) मधील भ्रष्टाचार, अनधिकृत वसुली आणि 'पक्षनिधी'च्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रथांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. "मद्यविक्रीतून मिळणारा प्रत्येक रुपया हा कोणत्याही पक्षाच्या खिशात न जाता थेट राज्याच्या तिजोरीत जमा झाला पाहिजे," असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
 
१,६०० कोटी रुपयांचा फटका!
 
 
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरमहा सुमारे १०२ कोटी रुपये अनौपचारिक 'पक्षनिधी'च्या नावाखाली कॉर्पोरेशनच्या व्यवहारांमधून बेकायदेशीरपणे वळवले जात होते. अंदाजानुसार, गेल्या पाच वर्षांत या गैरप्रकारामुळे राज्याच्या तिजोरीला तब्बल १,६०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष डीएमकेशी (DMK) संबंधित काही व्यवहारांचीही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
अनधिकृत रोख वसुली थांबवण्याचे आदेश राज्यात सध्या सुमारे ४,०४८ नोंदणीकृत मद्यविक्री केंद्रे आहेत. या केंद्रांच्या घाऊक आणि किरकोळ विक्री जाळ्यात अनेक वर्षांपासून सुरू असलेली अनधिकृत रोख वसुली तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संपूर्ण सुधारणांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क मंत्री के. विग्नेश यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ३७ वर्षीय विग्नेश हे अत्यंत साध्या कुटुंबातील असून, त्यांच्या पालकांनी चहाचे दुकान चालवले होते.
 
"आम्हाला जनतेला त्रास देणारा पैसा नको" मंत्रिमंडळ बैठकीतील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेविषयी बोलताना मंत्री विग्नेश म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, आमच्या सरकारला भ्रष्टाचारातून किंवा जनतेला त्रास देऊन गोळा केलेल्या पैशांची अजिबात गरज नाही. व्यवस्था पारदर्शक झालीच पाहिजे."
 
सूत्रांच्या मते, ही बेकायदेशीर वसुली गेल्या काही काळात व्यवस्थेचाच एक भाग बनली होती, ज्याला आता मुख्यमंत्री विजय यांनी पूर्णपणे खिळ घातली आहे. मद्यविक्रीच्या क्षेत्रानंतर आता इतरही अनेक विभागांमधील भ्रष्टाचारावर मुख्यमंत्र्यांचा चाबूक चालणार असल्याचे संकेत मिळत आहेत.