मुंबई,
Big Bs social media post बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. विविध विषयांवर विचार मांडणारे अमिताभ बच्चन यांचे एक ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. पहाटेच्या सुमारास त्यांनी हिऱ्यांच्या किमतींबाबत केलेल्या एका पोस्टनंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.

अमिताभ बच्चन यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पहाटे २.१२ वाजता एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी हिरे महाग असण्यामागील कारण स्पष्ट करताना, त्यांची किंमत दुर्मिळतेमुळे नसून ते शोधणे अत्यंत कठीण असल्यामुळे जास्त असल्याचे म्हटले. त्यांच्या या साध्या वाटणाऱ्या पोस्टने काही क्षणांतच सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक युझर्सनी अमिताभ बच्चन यांना देशातील महत्त्वाच्या घडामोडींवर भाष्य न करण्याबद्दल प्रश्न विचारले. काहींनी शैक्षणिक क्षेत्रातील वादग्रस्त मुद्दे, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि वाढत्या महागाईसारख्या विषयांवर त्यांनी मौन का बाळगले आहे, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे हिऱ्यांवरील पोस्टपेक्षा त्यावर उमटलेल्या प्रतिक्रियांचीच अधिक चर्चा रंगली.
काही युझर्सनी त्यांच्या पोस्टखाली भावनिक प्रतिक्रिया देत सार्वजनिक जीवनातील प्रभावशाली व्यक्तींनी सामाजिक प्रश्नांवरही भूमिका मांडली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तर काहींनी विनोदी शैलीत प्रतिक्रिया देत हिऱ्यांपेक्षा सामान्य नागरिकांच्या अडचणी अधिक महत्त्वाच्या असल्याचे म्हटले.
दरम्यान, या ट्विटच्या काही मिनिटांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर प्रेरणादायी विचारांशी संबंधित लेखनही प्रकाशित केले होते. मात्र, सोशल मीडियावरील चर्चेचे केंद्रबिंदू त्यांच्या हिऱ्यांबाबतच्या पोस्टभोवतीच फिरताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांनी अद्याप या टीकेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून, त्यांचे हे ट्विट आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत.