अंगणातील बगीचा स्पर्धा बक्षीस वितरण
यवतमाळ,
Dr. Nitin Kharche: Environment Protector Award पक्ष्यांच्या आवागमनाचे काही किमी रुंदीचे फक्त सहा महामार्ग आहेत. या मार्गातील एक म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील लहानमोठ्या 2 हजार तलावांमधे पक्ष्यांचे वैविध्य आहे, असे प्रतिपादन पक्षीतज्ञ डॉ. प्रवीण जोशी यांनी केले. ज्येष्ठ नागरिक मंडळद्वारा आयोजित जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांना जलसंधारणार्थ केलेल्या अतुलनीय कार्यासाठी ज्येष्ठ नागरिक मंडळाचा ‘पर्यावरण रक्षक पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जोशी बोलत होते. यावेळी त्यांनी डॉ. खर्चे यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांचे अभिनंदन केले. ई-बर्ड या स्थळावर यवतमाळ नाव टाकल्यास त्या ठिकाणी त्यांनी नोंदवलेल्या यवतमाळ परिसरात आढळणाèया 346 पक्षांची यादी आणि छायाचित्रे आढळतील, अशी माहिती देत त्यांनी निसर्ग संतुलनातील पक्ष्यांचे स्थान विविध उदाहरणातून डॉ. जोशी यांनी त्यांच्या व्याख्यानात अधोरेखित केले.
महाराष्ट्रात अंदाजे 8.50 लाख पक्षी रोज तेवढ्याच संख्येत वृक्ष फळे खाऊन त्यांच्या बियांचे विष्ठेद्वारा प्रसारण करतात आणि मानवाचा त्या वृक्षांच्या रोपणाचा भार हलका करतात. पक्ष्यांच्या अभ्यासात एका लहानशा पक्षाने अथक 11 दिवस कुठेही न थांबता 13500 किलोमिटर प्रवास केल्याची नोंद असल्याचे, तसेच सर्वाधिक वेगवान पक्षी ताशी 340 किमी वेगाने उड्डाण करू शकतो, अशा रंजक माहितीने त्यांनी त्यांचे व्याख्यान खुलविले. या दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक महिला समितीद्वारा आयोजित अंगणातील बगीचा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ याच मंचावर आयोजित करण्यात आला होता. सहायक वनसंरक्षक दादासाहेब तौर आणि मुख्य सल्लागार बळवंत चिंतावार, महिलाप्रमुख शीला कांबळे यांचीही याप्रसंगी मंचावर प्रमुख उपस्थिती होती. बगीचा स्पर्धेत जयश्री मेहंदळे यांना प्रथम, शरद मन्नेरवार यांना द्वितीय आणि डॉ. रवींद्र दुर्गे यांना तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संचालक ओंकार ढोले यांनी संचालन केले.
डॉ. नितीन खर्चे यांना शाल, गुलाब पुष्प रोपटे, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन ज्येष्ठ संचालक विजय उपलेंचवार, प्रकाश दामले यांच्यासह मंचावरील मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण रक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन यशवंत पाटील यांनी केले. राज्यातील सिरपूर येथील नदी खोलीकरणाद्वारे जलसंधारण नमुन्यावर स्वतःचा पावसाच्या पाण्याचा पुनर्भरणाचा नमुना विकसित करून त्याचे स्वतःच्या घरासमोरील मोकळ्या मैदानावर 2005 साली प्रयोग केले. तत्पूर्वी पाण्याचा दुष्काळ अनुभवलेल्या या विश्वासनगर परिसरातील सर्व विहिरींच्या पाणीपातळीत अमूलाग्र वाढ होऊन परिसर पाणी टंचाईमुक्त झाला.
घराघरातील पावसाच्या पाण्याचे पुनर्भरणाचे देखील असेच मॉडेल विकसित करण्यात आले. या मोकळ्या परिसरात एका देखण्या आदिशक्ती उद्यान आणि जैवविविधतासंपन्न श्रद्धावनाचे यशस्वी निर्माण करता आले. यामुळे या विश्वासनगर पॅटर्नचा प्रसार गेली वीस वर्षे भोवतालच्या परिसरात करून अनेक गावांना, अनेक वसाहतींना याच लाभ देता आला, असे या उपक्रमाचे प्रात्यक्षिकांसह आजवरच्या वाटचालीचे दृकश्राव्य सादरीकरण डॉ. खर्चे यांनी यावेळी केले. दादासाहेब तौर यांनी त्यांच्या मनोगतातून वृक्षांच्या पर्यावरणातील स्थानाची महती सांगितली. बळवंत चिंतावार यांनी पर्यावरण रक्षणार्थ नगर परिषदेला ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या माध्यमातून पाठवलेल्या सूचनांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांपासून प्रेरित होऊन या दिनी ज्येष्ठ नागरिकांनी पर्यावरण रक्षणार्थ उपाययोजनांचा प्रसार करण्यास संकल्पकृत व्हावे, अशी अपेक्षा अध्यक्ष राजन टोंगो यांनी व्यक्त केली.
Dr. Nitin Kharche: Environment Protector Award कार्यक्रमाचे संचालन स्वाती सहस्रबुद्धे यांनी केली. सचिव पांडुरंग ढुमणे यांनी प्रास्ताविक केले. पर्यावरण रक्षणार्थ जागरूकता निर्माण होण्यासाठी फेस्कॉमद्वारा राज्यातील 6000 संघांमध्ये पर्यावरण दिन कार्यक्रमाचे नियमित आयोजन करण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली. उपाध्यक्ष विनोद सहस्रबुद्धे यांनी डॉ. प्रवीण जोशी यांचा परिचय करून दिला. प्रल्हाद हिंगमिरे यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाचा शुभारंभ सहसचिव पांडुरंग मुसळेंद्वारा संचालित वृक्षारोपण कार्यक्रमाने करण्यात आला. मंचावरील कार्यक्रम सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्वलनासह, कृष्णा तपके यांनी म्हटलेल्या, ‘हरीभरी वसुंधराके साथ नीला नीला ये गगन’ या स्वागतगीताने प्रारंभ झाला. या आयोजनात संचालक प्रा. अनिल दुर्गे, चित्रा देशपांडे आणि ज्येष्ठ कट्टा संचालक दिवाकर तिरमारे, व्यवस्थापक विनोद राजनकर यांचा विशेष सहभाग होता.