ईएसआयसी नोंदणीकृत विमा कामगार पाल्यासाठी वैद्यकीय प्रवेश कोटा

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
२२ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ७८३ जागा राखीव
एमबीबीएस, बीडीएस व बीएससी (नर्सिंग) अभ्यासक्रम
 
नागपूर, 
Employees' State Insurance Corporation कामगार राज्य विमा महामंडळांतर्गत (ईएसआयसी) नोंदणीकृत विमाधारक कामगार-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी देशभरातील २२ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीएस व बीएससी (नर्सिंग) अभ्यासक्रमात यंदा ७८३ जागा राखीव ठेवल्या आहेत. शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी पदवीपूर्व वैद्यकीय व नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता अर्ज मागविण्यात आले असून ही प्रवेशाची संधी केवळ कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत समाविष्ट कामगारांच्या अवलंबून असलेल्या मुलांसाठी आहे. विमाधारक व्यक्तींच्या पाल्यांसाठीच्या कोट्यांतर्गत एकूण ७८३ जागा तात्पुरत्या स्वरूपात राखीव आहेत.
 
 
esic
 
यामध्ये २२ वैद्यकीय, दंत व नर्सिंग संस्थांमधील ६९५ एमबीबीएस जागा, २८ बीडीएस जागा, ६० बी.एस्सी. नर्सिंग जागांचा समावेश आहे. यामध्ये विविध राज्यांमधील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालये व निवडक राज्य सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत आरोग्य सेवा महासंचालनालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या मध्यवर्ती समुपदेशन प्रक्रियेद्वारे ही प्रवेश प्रक्रिया होईल. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना व्यावसायिक वैद्यकीय व नर्सिंग शिक्षण घेण्यासाठी अत्यंत सवलतीच्या दरात शुल्क आकारले जाते. या कोट्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमासाठी प्रति वर्ष २४ हजार तर बी.एस्सी. नर्सिंगसाठी प्रतिवर्ष १० हजार रुपये शुल्क द्यावे लागते. या कोट्यांतर्गत प्रवेशासाठी कोणतेही प्रति व्यक्ती शुल्क किंवा देणगी स्वीकारली जात नाही.
 
 
 
Employees' State Insurance Corporation  या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे पालक हे ३० सप्टेंबर २०२५ रोजी ईएसआय योजनेत सक्रियपणे योगदान देणारे नोंदणीकृत विमाधारक व्यक्ती असले पाहिजेत. अर्जदार हा ‌नीट (यूजी) परीक्षेला बसलेला असावा. विमाधारक व्यक्तीवर अवलंबून असलेला मुलगा किंवा मुलगी असणे आवश्यक असून त्याने पात्रतेच्या सर्व अटी व निकष पूर्ण करणेदेखील आवश्यक आहे. अर्जदार मुलगा असेल तर त्याचे वय ०८ मार्च २०२६ रोजी २१ वर्षांपेक्षा जास्त नको. ईएसआयसी कायदा, १९४८ च्या तरतुदींनुसार विमाधारक व्यक्तीवर अवलंबित अविवाहित महिला पाल्यासाठी वयोमर्यादा नाही. आयपी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २१ जून २०२६ आहे. अर्ज प्रक्रियेमध्ये ओटीपी-आधारित प्रमाणीकरणाचा समावेश असल्याने उमेदवारांनी विमाधारक व्यक्तीचा मोबाईल क्रमांक ईएसआयसी डेटाबेसमध्ये अचूक अद्ययावत असल्याची खात्री करावी. आयपी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, उमेदवारांनी केंद्रीकृत समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी वैद्यकीय समुपदेशन समिती पोर्टलवर स्वतंत्रपणे नोंदणी करणे आवश्यक आहे.