गुरुग्राम,
murder-following-a-dispute : हरियाणातील गुरुग्राम येथे कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीशी झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. आईला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या मुलालाही त्याने गोळी घालून ठार केले. घटनेनंतर आरोपी घरातच मृतदेहांजवळ बसून राहिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुग्राममधील अशोक विहार परिसरात रविवारी पहाटे घडली. घरामध्ये पती-पत्नीमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापलेल्या पतीने बंदुकीतून पत्नीवर गोळीबार केला. आईवर हल्ला होत असल्याचे पाहून त्यांचा २५ वर्षीय मुलगा मध्ये पडला. मात्र आरोपीने त्याच्यावरही गोळी झाडली. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
मृत महिला स्थानिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती. तिचे वय सुमारे ४५ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. मुलगाही शिक्षित असून कुटुंबासोबत राहत होता. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घरात प्रवेश केला असता आरोपी मृत पत्नी आणि मुलाच्या मृतदेहांजवळ बसलेला आढळून आला. त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.
प्राथमिक तपासात ही घटना दीर्घकाळ सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असून आरोपीची सखोल चौकशी करण्यात येत आहे.