मुंबई,
inflation : देशात वाढत असलेल्या महागाईच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. वाढत्या महागाईची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत जागतिक परिस्थितीमुळे अनेक देशांसमोर अशाच अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले.
अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठांवर परिणाम होत असून त्याचे पडसाद भारतातही उमटताना दिसत आहेत. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे अनेक अत्यावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. नुकतीच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात भर पडली आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. महागाईचा थेट फटका सामान्य जनतेला बसत असल्याचे सांगत त्यांनी, "महागाई नियंत्रणात आणण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, नियंत्रणाच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने दरवाढ होत असेल तर त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी मोजावी लागेल," असे मत व्यक्त केले.
पवारांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक परिस्थितीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, सध्या जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीचा परिणाम अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर होत असून भारतही त्याला अपवाद नाही. इंधन आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किमती वाढणे ही केवळ भारतापुरती मर्यादित बाब नसून जगभरात असे चित्र दिसत आहे. केंद्र सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी फडणवीस यांनी आगामी मान्सून आणि अल निनोच्या प्रभावाबाबतही भाष्य केले. सरासरी पावसाचे प्रमाण सुमारे ९२ टक्के राहण्याचा अंदाज असला तरी मराठवाडा, दक्षिण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाकडून सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे. कमी पावसाच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांचे नुकसान कमीत कमी कसे होईल, यासाठी विविध उपाययोजना आणि नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महागाई, इंधन दरवाढ आणि मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी वर्गाच्या चिंता वाढल्या असताना या विषयांवरून राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपही तीव्र होताना दिसत आहेत.