स्वप्नांचा पाठलाग करत ‘स्पोर्ट्स स्टार’ बनलेली मराठमोळी आरोही

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
- वकिलीच्या पुस्तकांतून थेट क्रीडा विश्वाच्या प्रकाशझोतात
- विधी शर्मा
 
नागपूर, 
International Sports Competitions: Aarohi Thatte आज विदर्भ प्रीमियर लीगच्या मैदानावर हजारो नजरा खेळाडूंवर असतील. पण त्याचवेळी अनेकांचे लक्ष एका मराठमोळ्या चेहऱ्याकडेही खिळणार आहे. तो चेहरा आहे आरोही मिलिंद थत्ते हिचा. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या दमदार सादरीकरणाने ओळख निर्माण करणारी आरोही आज व्हीपीएल २०२६ मध्ये स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून नागपूरच्या मंचावर झळकणार आहे. विशेष म्हणजे, या यशस्वी तरुणीचे नागपूरशीही घट्ट नाते आहे.
 
Arohi 1
 
स्टार स्पोर्ट्स, सोनी स्पोर्ट्स, जिओस्पोर्ट्स आणि अनेक जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहज वावरणारी आरोही काही वर्षांपूर्वी कायद्याचे शिक्षण पूर्ण करणारी एक सामान्य विद्यार्थिनी होती. लॉकडाऊनच्या काळात हातात वेळ होता, पण दिशा नव्हती. त्या काळात घेतलेला एक छोटासा निर्णय तिच्या आयुष्याला नवे वळण देऊन गेला. आज विपीएलच्या मंचावर उभे राहण्यापूर्वी आरोहीने ‘दै. तरुण भारत’शी मनमोकळा संवाद साधला.

 
लहानपणापासून इंग्रजी साहित्य वाचनाची आवड आणि खेळांबद्दलचे आकर्षण यामुळे तिची भाषाशैली आणि व्यक्तिमत्त्व घडत गेले. दहावी-बारावीत उत्तम यश मिळवल्यानंतर तिने पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. त्याचबरोबर बी.कॉम. पूर्ण केले आणि नंतर एलएल.एम.ची पदवीही मिळवली. आज ती बौद्धिक संपदा हक्क विषयात पीएचडी करत असून विधी महाविद्यालयांमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही कार्यरत असल्याचे आरोहीने सांगितले. लग्नापूर्वी नागपूरकर असलेली आरोहीची आई अनया थत्ते प्राध्यापिका आणि वडील मिलिंद थत्ते वकील असल्याने घरात शिक्षणाला प्राधान्य होते.
- लॉकडाऊनमध्ये सापडली नवी दिशा
२०२० मध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण होत असतानाच लॉकडाऊनमुळे अनेक योजना ठप्प झाल्या. जवळपास आठ महिने कोणतेही ठोस काम नसताना आरोहीने स्वतःला नव्या क्षेत्रात आजमावण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये एका मित्राने सुचवलेल्या स्पोर्ट्स अँकरिंगच्या कल्पनेला तिने पुन्हा उजाळा दिला. काही नमुना व्हिडिओ तयार करून तिने विविध प्लॅटफॉर्मवर पाठवले. सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये विनामूल्य काम करत अनुभव आणि संपर्क वाढवण्यावर तिने भर दिला.
- ‘संधीची वाट पाहू नका, संधी निर्माण करा’
स्पोर्ट्सकीडा आणि कर्ली टेल्ससारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रॉड्युसर आणि अँकर म्हणून काम करताना तिला कॅमेऱ्यासमोरील आणि पडद्यामागील दोन्ही जग समजले. याच अनुभवातून तिला स्टार स्पोर्ट्सची संधी मिळाली. अनेक ऑडिशन्सनंतर प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या पर्वासाठी तिची निवड झाली. कबड्डीबद्दल विशेष ज्ञान नसतानाही तिने अभ्यास करून स्वतःला सिद्ध केले आणि पुढील पर्वातही स्थान कायम राखले.
International Sports Competitions: Aarohi Thatte  त्यानंतर तिची कारकीर्द वेगाने पुढे सरकली. सोनी स्पोर्ट्स, जिओस्पोर्ट्स, दूरदर्शन आणि विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून काम केले. क्रिकेट, व्हॉलीबॉल, कुस्ती, पिकलबॉल, फेन्सिंग, गोल्फ, सायकलिंग आणि बुद्धिबळ यांसारख्या विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये तिची उपस्थिती पाहायला मिळाली.
- परंपरेशी नाते कायम
आधुनिक आणि आव्हानात्मक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असतानाही आरोहीने आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते कायम ठेवले आहे. आई डॉ. अनया थत्ते आणि मावशी रुपाली वाटवे यांच्याकडून ती शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असून गांधर्व महाविद्यालयाच्या विशारद परीक्षेची तयारी करत आहे. ट्रेकिंगचा छंदही ती जोपासते.
- तरुणांसाठी संदेश
आरोहीच्या मते, कोणतेही मोठे यश एका दिवसात मिळत नाही. "योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच संधी निर्माण करा. खेळांबद्दल किंवा कोणत्याही क्षेत्राबद्दल खरी आवड असेल, तर सुरुवात कुठूनही करा. अनुभव, मेहनत आणि सातत्य यांची जोड मिळाली की यशाचा मार्ग आपोआप तयार होतो," असे ती सांगते.
कायद्याच्या वर्गखोल्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचापर्यंतचा आरोही थत्तेचा प्रवास आज अनेक तरुणांसाठी स्वप्नांना पंख देणारी प्रेरणादायी कहाणी ठरत आहे.