- माफसूच्या दूध केंद्रासमोर अस्तित्वाचे आव्हान
नागपूर,
Milk price hikes महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) तेलंगखेडी येथील पशुवैद्यक महाविद्यालय परिसरात सुरू करण्यात आलेल्या ‘दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्रा’समोर दुधाच्या दरवाढीमुळे नवे आव्हान उभे ठाकले आहे. कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश सामान्य नागरिक, शेतकरी आणि ग्रामीण युवकांना दुग्ध व्यवसायातील संधींबाबत प्रेरित करणे तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक प्रशिक्षण देणे हा होता. मात्र, १ जूनपासून करण्यात आलेल्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
नवीन दरानुसार गायीच्या दुधाची किंमत प्रतिलिटर ६० रुपयांवरून ८० रुपये, तर म्हशीच्या दुधाची किंमत ७० रुपयांवरून १०० रुपये करण्यात आली आहे. या वाढीचा थेट परिणाम विक्रीवर झाल्याचे दिसून येत असून, दररोज १७ ते २० लिटर गायीचे दूध विक्रीविना शिल्लक राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, या केंद्राच्या परिसरातच उपलब्ध असलेल्या इतर दूध विक्री केंद्रांमध्ये गायीचे दूध सुमारे ५८ रुपये आणि म्हशीचे दूध ७२ रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध असल्याने ग्राहकांनी माफसूच्या दरवाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे दर्जेदार आणि शुद्ध दूध उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाच्या स्पर्धात्मकतेवरही परिणाम होत असल्याची चर्चा आहे.
Milk price hikes दरम्यान, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयंत कोरडे यांनी या केंद्राचा मुख्य उद्देश दूध विक्री नसून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीला प्रोत्साहन देणे असल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, केंद्रावर मोठ्या अक्षरांत ‘दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र’ असा फलक झळकत असताना गेल्या काही महिन्यांत वरुड डेअरी तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले पेढे, कलाकंद, श्रीखंड, मैसूर पाक यांसारखी उत्पादने नियमितपणे उपलब्ध नसल्याची बाबही समोर आली आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, दुग्धव्यवसायातील स्टार्टअप संस्कृतीला चालना देणे आणि सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे या मूळ उद्दिष्टांपासून हा उपक्रम दूर जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरवाढीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर विद्यापीठ प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.