दिल्ली-एनसीआरमध्ये २५ जूननंतर मान्सूनचा अंदाज

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Monsoon केरळमध्ये नैऋत्य मान्सून दाखल झाल्यानंतर तो आता देशाच्या विविध भागांकडे वेगाने पुढे सरकत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत मान्सून उत्तर भारतातही पोहोचण्याची शक्यता असून उष्णतेपासून मोठा दिलासा मिळणार आहे. देशातील अनेक भागांमध्ये सध्या तीव्र उष्णतेची लाट कायम असून तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये २५ ते ३० जूनदरम्यान मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशात तो २० ते २५ जूनदरम्यान दाखल होऊ शकतो.
 
Monsoon
 
मान्सूनच्या आगमनानंतर दिल्ली-एनसीआरसह नोएडा, गुरुग्राम आणि गाझियाबादसारख्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना कडक उन्हाळ्यापासून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून पुढे सरकत हरियाणा, पंजाब आणि चंदीगडमध्येही प्रवेश करेल. तसेच हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख भागातही पावसाचा प्रभाव जाणवू शकतो.
 
गेल्या वर्षी मान्सून २९ जून रोजी दिल्लीत पोहोचला होता, तर यंदा तो वेळेवर किंवा थोडा लवकर दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केरळमध्ये ४ जून रोजी दाखल झालेला मान्सून त्यानंतर गोवा आणि महाराष्ट्रातही वेगाने पसरला असून पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. एकूणच, मान्सूनच्या आगमनामुळे देशातील तापमानात घट होण्याची शक्यता असून उष्णतेच्या झळांपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.