राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलीम कुमार अनंतात विलीन

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
कोची,
Salim Kumar passes away मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते विनोदी कलाकार सलीम कुमार यांचे शनिवारी रात्री वयाच्या ५६व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर कोचीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
 
 
Salim Kumar passes away
 
मिमिक्री कलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सलीम कुमार यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या विनोदी शैलीमुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या इष्टमानु नूरु वट्टम या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी शेकडो चित्रपटांत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली.
 
त्यांच्या कारकिर्दीतील सीआयडी मूसा, मीशा माधवन, कल्याणरामन, मायावी आणि पट्टालम यांसारख्या चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या. विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर अभिनयातही त्यांनी आपली छाप उमटवली. २०१० मधील अदामिन्ते मकान अबू या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
 
त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीसह देशभरातील चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. मामूटी, पृथ्वीराज सुकुमारन आणि अन्य कलाकारांनी सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आरोग्याच्या कारणांमुळे गेल्या काही वर्षांत त्यांनी चित्रपटांमधील कामकाज कमी केले होते. तरीही त्यांच्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिला. त्यांच्या निधनामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीने एक बहुआयामी कलाकार गमावला असून, त्यांनी निर्माण केलेला विनोद आणि अभिनयाचा वारसा कायम स्मरणात राहणार आहे.