जनजाती समाजात भारतीय संस्कृतीचे दर्शन

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
* योगेश बापट यांचे प्रतिपादन
* चंद्रपुरात कौशल्य विकास केंद्राचे लोकापर्ण

चंद्रपूर, 
जनजाती गावात गेले की ते तुम्ही कुणाचे कोण विचारतच नाही. लगेच आदरतिथ्य करतात. भोजनाची व्यवस्था करतात. जशपूर येथे आंब्याची घुई भरल्याशिवाय आणि त्या आंब्याची पूजा केल्याशिवाय ते आंबा खात नाही, एवढा महान विचार या समाजात आहे. ईर्ष्या, द्वेष त्यांच्या लेखी कुठेच नाही आणि म्हणून स्पर्धेचा भावही नाही. पण जनजातीच्या तरुणांना नोकरी व व्यवसायाच्या स्पर्धेत उतरयाचे तर कौशल्य विकास साधला पाहिजे. भारतीय संस्कृतीचे दर्शन घ्यायचे असेल, तर जनजाती समाजात जा, असे प्रतिपादन वनवासी कल्याण आश्रमचे Rashtriya Mahamantri Yogesh Bapat राष्ट्रीय महामंत्री योगेश बापट यांनी येथे केले.
 
 
lokarpan
 
जनजाती विकास समिती, गडचिरोलीच्या वतीने रविवार, 7 जून रोजी सायंकाळी चंद्रपुरातील दुर्गापूर परिसरात कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा योगेश बापट यांच्या हस्ते पार पडला. मंचावर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, खासदार माया इवनाते, रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, जनजाती विकास समितीचे अध्यक्ष सोमाजी तेलामी, उपाध्यक्ष रामजीवन परमार प्रभृती उपस्थित होते. तसेच रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, नगर संघचालक अ‍ॅड. रवींद्र भागवत यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
 
 
Rashtriya Mahamantri Yogesh Bapat  योगेश बापट पुढे म्हणाले, नागरी समाज स्वतःला प्रगत म्हणतो. पण सांस्कृतिक प्रगती बघितली तर जनजाती समाज जास्त पुढारलेला वाटतो. तेथे भारतीय संस्कृती अजूनही जपली जाते. आम्ही गडचिरोली भागातील वनवासी पाड्यांमध्ये काम केले आहे. तेव्हा शहरातून कपडे नेऊन तिकडे वितरित केले जात होते. आता ती गरज पूर्ण झाली आहे. पण जनजातीच्या तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्याची सोय जनजाती विकास समितीने केली आहे, जी स्तुत्य आहे. तर खासदार माया इवनाते यांनी, जनजाती विकास समितीचे कार्य खुप चांगले असून, ज्या भागात खरी गरज आहे तेथे त्यांचे काम सुरू आहे. या कामात आम्ही सारे सोबत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक समितीचे सचिव विकास वडेट्टीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरूवातील जनजाती विकास समितीच्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली.
 
जनजातींनी आपली संस्कृती, अस्मिता जपावीः डॉ. उईके
आमच्या आदिवासीं समाजाची ओळख देवांनी होते. आडनाव ऐकले की ते किती देवे आहेत, हे कळते आणि आमच्यातले नातेही कळते. जनजातींची संस्कृती एक आदर्श आहे. तो आदर्श जपला गेला पाहिजे. आमची संस्कृती, देव पध्दती ही आम्ही जपली पाहिजे. सोबतच शिक्षण व प्रशिक्षण घेतले पाहिजे. शिकून काय होणार, हा विचार सोडला पाहिजे. समाजाची उन्नती या दोन्ही पातळ्यांवर होत राहिली पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी याप्रसंगी केले.