रस्त्यावरील संघर्ष की भविष्याची वाट?

शाहीन बागच्या अनुभवाची आठवण

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Shaheen Bagh राजधानी दिल्लीतील काही भागांमध्ये प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजामध्ये सावधगिरीचा सूर उमटताना दिसत आहे. सोशल मीडियावरील विविध गट, धार्मिक संघटना आणि स्थानिक स्तरावरील चर्चांमधून तरुणांना कोणत्याही आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी त्याचे परिणाम आणि उद्देश समजून घेण्याचे आवाहन केले जात आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनामुळे शाहीन बाग देशभर चर्चेत आले होते. मात्र, सध्याच्या घडामोडींमध्ये अनेक ठिकाणी वेगळी भूमिका समोर येत आहे. सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या संदेशांमध्ये तरुणांना भावनिक निर्णय घेण्याऐवजी शिक्षण, करिअर आणि वैयक्तिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Shaheen Bagh
काही संदेशांमध्ये आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य कायदेशीर किंवा सामाजिक परिणामांविषयीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी परिस्थितीचा सखोल विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, दिल्लीतील काही मशिदींमध्ये शुक्रवारी नमाजानंतरही याच विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. धार्मिक नेत्यांनी तरुणांना संयम बाळगण्याचा सल्ला देत समाजातील सकारात्मक बदल शिक्षण, आर्थिक प्रगती आणि सामाजिक कार्यातून घडवून आणण्यावर भर दिला. भावना आणि उत्साह महत्त्वाचे असले तरी निर्णय विवेकाने आणि जबाबदारीने घेतले पाहिजेत, असे मत व्यक्त करण्यात आले.
काही धर्मगुरूंनी कोणत्याही आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी त्याचा उद्देश, आयोजक आणि आंदोलनाचे स्वरूप समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. शांततापूर्ण मार्गाने मत व्यक्त करणे हा लोकशाहीचा भाग असला, तरी संभाव्य तणाव किंवा गोंधळ टाळण्यासाठी सावध भूमिका घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तथापि, या मुद्द्यावर समाजात एकमत नसल्याचेही दिसून आले. काही नागरिकांनी शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक आणि लोकशाही हक्क असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे सामाजिक माध्यमांवर या विषयावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, आंदोलनात सहभाग आणि त्याचे परिणाम यावर व्यापक चर्चा सुरू आहे.