चौक, रस्ते अन् पोलिस ठाणेही जलमय
उमरखेड,
Umarkhed Municipal Council मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसाने उमरखेड शहरातील विकासकामांच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. राज्य शासनाने शेतकèयांसाठी ‘शेततळे’ योजना आणली होती, मात्र उमरखेड शहरात नगर परिषदेकडून जणूकाही ‘शहर रस्तातळे’ योजना राबविण्यात आल्याचा भास आज सकाळी नागरिकांना झाला. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी साचल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली.
विशेष म्हणजे शहरातील पोलिस ठाण्याच्या आवारातही पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहनधारकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर तळ्याचे स्वरूप निर्माण झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये ठेकेदारांकडून करण्यात आलेले अर्धवट रस्ते, अपूर्ण नाली बांधकाम आणि नियोजनाचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचले असून येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Umarkhed Municipal Council राजकीय हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप आणि विकासकामांतील दिरंगाई याचा फटका मात्र थेट जनतेला बसत आहे. पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली असताना शहरातील नागरिकांना पुढील काही महिने चिखल, खड्डे, पाणी साचणे आणि वाहतुकीच्या समस्यांचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांनी या परिस्थितीसाठी मानसिक तयारी ठेवावी, असा उपरोधिक सूरही काही नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण न झाल्यास यंदाचा पावसाळा उमरखेडकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. आता तरी संबंधित प्रशासन, नगर परिषद आणि ठेकेदार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.