नवी दिल्ली,
vaibhav-suryavanshi : भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख तारा वैभव सूर्यवंशी याच्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विशेष निर्णय घेतला आहे. अवघ्या १५ वर्षांच्या वयात भारतीय संघात स्थान मिळवलेल्या वैभवच्या आगामी परदेश दौऱ्यांदरम्यान त्याचे आई-वडीलही त्याच्यासोबत राहतील. त्यांच्या प्रवास आणि वास्तव्यासाठीचा सर्व खर्च BCCI उचलणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वैभवची नुकतीच आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघात निवड झाली आहे. एवढ्या लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वातावरणात प्रवेश करणाऱ्या खेळाडूला मानसिक आणि भावनिक आधार मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. BCCIच्या अधिकाऱ्यांनीही वैभव अद्याप केवळ १५ वर्षांचा मुलगा असल्याने त्याच्या कुटुंबाची उपस्थिती महत्त्वाची असल्याचे नमूद केले आहे.
आयपीएल २०२६ मधील शानदार कामगिरीमुळे वैभव चर्चेत आला होता. त्याच्या दमदार फलंदाजीमुळे त्याला भारतीय संघाचे दार खुले झाले. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनीही वैभवच्या कामगिरीने निवडकर्त्यांना त्याची निवड करण्यास भाग पाडल्याचे म्हटले होते.
वैभवच्या निवडीमुळे तो भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या सर्वात युवा खेळाडूंमध्ये गणला जात आहे. त्याच्या प्रतिभेची दखल देशभर घेतली जात असून क्रिकेट विश्वात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
BCCIच्या या निर्णयामुळे केवळ वैभवलाच नव्हे तर युवा खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी मंडळ किती संवेदनशील आहे, हेही अधोरेखित झाले आहे. आगामी परदेश दौऱ्यात वैभवची कामगिरी कशी राहते, याकडे आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.