सत्तेत येताच विजय 'ॲक्शन' मोडमध्ये

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
चेन्नई,
Vijay swings into action mode तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अभिनेते-राजकारणी विजय यांनी प्रशासनातील पारदर्शकता आणि भ्रष्टाचारविरोधी कारवाईला प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत त्यांनी सरकारी महसूल व्यवस्थेतील अनियमितता, कथित अवैध वसुली आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
Vijay swings into action mode
 
विशेषतः राज्याच्या मद्यविक्री व्यवस्थापनाशी संबंधित विभागातील आर्थिक व्यवहारांवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. महसुलातून मिळणारा निधी पूर्णपणे सरकारी तिजोरीत जमा होईल आणि कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत आर्थिक व्यवहारांना आळा घातला जाईल, असे निर्देश बैठकीत देण्यात आल्याचे सांगितले जाते. यासोबतच संबंधित विभागातील घाऊक आणि किरकोळ विक्री साखळीतील जुन्या आर्थिक पद्धतींचा आढावा घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या देखरेखीखाली या प्रक्रियेत सुधारणा करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
 
सरकारी सूत्रांच्या मते, काही विभागांमध्ये वर्षानुवर्षे रुजलेल्या कथित अनियमित व्यवहारांची चौकशी केली जाणार असून महसूल गळती रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबविल्या जातील. यामध्ये आर्थिक व्यवहारांची तपासणी, महसूल संकलनाच्या प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन आणि जबाबदारी निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम केवळ एका विभागापुरती मर्यादित राहणार नसून महसूलाशी संबंधित इतर विभागांतील कामकाजाचाही आढावा घेतला जाणार आहे. प्रशासनात पारदर्शकता वाढविणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे संकेत या निर्णयांमधून मिळत आहेत.