वरळीतील कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू; आयोजकांची चौकशी सुरू

-एनएससीआय डोममधील घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह -दोषींवर कारवाईचा शिंदेंचा इशारा

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
मुंबई,
eknath-shinde : मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका मोठ्या कॉन्सर्टदरम्यान २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आयोजकांविरोधात चौकशी सुरू केली असून कार्यक्रमातील सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
 
 
shinde
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, वृषभ गांगुर्डे हा तरुण कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला होता. कार्यक्रम सुरू असताना त्याची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
 
या प्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर क्र. १७/२०२६) करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
 
दरम्यान, याच कार्यक्रमादरम्यान प्रज्ञान रे या ३१ वर्षीय महिलेचीही प्रकृती बिघडली होती. तिला उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिने कार्यक्रमादरम्यान मद्य आणि एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्याचे सांगितले आहे. मात्र, अंमली पदार्थांच्या सेवनाबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.
 
मृत वृषभ गांगुर्डे हा कायद्याचे शिक्षण घेत होता. त्याने कोलकात्यातून वकिलीचे शिक्षण घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
हा कॉन्सर्ट ‘स्पेसबाउंड’ या कंपनीतर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी प्रत्येकी सुमारे चार हजार रुपयांचे तिकीट आकारण्यात आले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यक्रमात पुरेशी सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय मदत आणि गर्दी नियंत्रणाची उपाययोजना करण्यात आली होती का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
 
पोलिसांनी कार्यक्रमस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि इतर तांत्रिक माहितीची तपासणी सुरू केली आहे. आयोजक कंपनीच्या संबंधित सदस्यांचीही चौकशी केली जात असून या घटनेमागील वास्तविक कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. "घटनेची सखोल चौकशी सुरू असून तपासात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल," असे त्यांनी सांगितले.
 
या घटनेमुळे मुंबईतील मोठ्या कॉन्सर्ट्स आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधील सुरक्षा मानके, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि आयोजकांची जबाबदारी याविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता पोलिस तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.