उमरखेड काँग्रेसला जबर धक्का
उमरखेड,
yavatmal vidhan parishad nivadanuk यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेत राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे आणि त्यानंतर हकालपट्टी झालेले काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी अखेर रविवार, 7 जूनला मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनीही शिवसेनेची वाट धरल्याने उमरखेड परिसरात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने साहेबराव कांबळे यांच्यावर विश्वास दाखवत उमरखेड मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. राजकारणात तुलनेने नवखे असतानाही त्यांनी निवडून आलेले भाजपाचे आमदार किसन वानखेडे यांच्याविरुद्ध जोरदार लढत देत काँग्रेस कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण केले होते. त्यांच्या नेतृत्वात पक्षाचे विविध कार्यक्रम, आंदोलने आणि संघटनात्मक उपक्रमांना वेग मिळाला.
नगर परिषद निवडणुकीतही त्यांनी जनशक्ती पॅनेलच्या माध्यमातून काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक वर्षांपासून मरगळलेल्या काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी स्वीकारल्यानंतर अचानक माघार घेतल्याने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमात पडले. साहेबराव कांबळे यांच्या माघारीच्या निर्णयानंतर उमरखेडमध्ये काँग्रेसवाल्यांनी निषेध आंदोलन करत नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे कोणतेही बॅनर अथवा पोस्टर न लावता हे आंदोलन करण्यात आले. मात्र त्यानंतर दोनच दिवसांत साहेबराव कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसवाल्यांची पार जिरून गेली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, मागील दोन वर्षांत उमरखेडमध्ये काँग्रेसला मिळालेली ऊर्जा, जनाधार आणि संघटनात्मक बळ हे मोठ्या प्रमाणात साहेबराव कांबळे यांच्या सक्रियतेमुळे वाढले होते. त्यामुळे त्यांच्या निर्गमनामुळे काँग्रेस पुन्हा नेतृत्वाच्या शोधात असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या पक्षातील कार्यकर्ते जोमात असले तरी स्थानिक नेतृत्व गोंधळलेल्या अवस्थेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
yavatmal vidhan parishad nivadanuk मुळात शिवसेनेशी आणि खासकरून एकनाथ शिंदेंशी संबंध असल्याची पूर्वीपासूनच चर्चा असलेल्या साहेबराव कांबळेंना काँग्रेसमध्ये घेतात काय, त्यांना विधानसभेची उमेदवारी देतात काय, त्यांना प्रदेश सरचिटणीस करतात काय, त्यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी देतात काय, ते त्या घेतलेल्या उमेदवारीवर ऐन वेळेवर लाथ मारून शिवसेनेत जातात काय, हे सारेच काँग्रेसवाल्यांची पार जिरवून टाकणारे ठरले आहे.
पराभूत आणि हताश काँग्रेस..!
यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत साहेबराव कांबळे या त्यांच्याच पक्षाच्या माणसाने उमेदवारी मागे घेतल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाèयांकडे निवडणूक पुन्हा घेण्याची आणि ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र अशा प्रकारची कोणतीही तरतूद निवडणूक प्रक्रियेत नसताना करण्यात आलेली ही मागणी हास्यास्पद असून ती पराभूत आणि हताश मानसिकतेचे दर्शन घडवणारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.