मुंबई,
Yudhveer Ahlawat नेटफ्लिक्सवर अलीकडेच प्रदर्शित झालेली ‘करवत’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत सैफ अली खान मुख्य भूमिकेत असून, त्याच्यासोबत युधवीर अहलावत याच्या अभिनयाने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. किशोरवयीन पात्राची प्रभावी भूमिका साकारल्यामुळे युधवीरच्या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. मालिकेत युधवीरने साकारलेले पात्र इतके वास्तवदर्शी वाटले की अनेक प्रेक्षकांनी तो प्रत्यक्षातही किशोरवयीन असल्याचे मानले. मात्र नंतर त्याचे खरे वय समोर आल्यानंतर प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. युधवीर अहलावत सध्या ३३ वर्षांचा असूनही त्याने किशोरवयीन भूमिकेत अत्यंत नैसर्गिक अभिनय सादर केला आहे.
हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील शेरिया गावचा रहिवासी असलेला युधवीर अभिनय क्षेत्रात तुलनेने नवीन असूनही त्याने काही निवडक प्रोजेक्ट्समधून आपली ओळख निर्माण केली आहे. २०१९ मध्ये ‘सांड की आँख’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘आय लव्ह हॉस्टेल’ आणि काही वेब सीरिजमधील भूमिकांमधून तो प्रेक्षकांसमोर आला.
‘करवत’मधील त्याच्या भूमिकेमुळे त्याला अधिक व्यापक ओळख मिळाली असून त्याच्या अभिनयाची विशेष दखल घेतली जात आहे. कमी प्रोजेक्ट्स असूनही प्रभावी कामगिरीमुळे तो ओटीटी विश्वात उदयोन्मुख कलाकार म्हणून पुढे येत असल्याचे मानले जात आहे. सोशल मीडियावरही त्याच्या अभिनयाचे कौतुक होत असून आगामी काळात त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स असल्याची चर्चा आहे.