चित्रपट महामंडळाच्या मतमोजणी केंद्रावर अंधश्रद्धेचा प्रकार

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
कोल्हापूर
Marathi Film Corporation Election अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच कोल्हापुरातील मतमोजणी केंद्रावर अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मतमोजणी केंद्राबाहेरील एका खुर्चीवर लिंबू, अंगारा आणि अगरबत्ती ठेवण्यात आल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत चर्चा रंगल्या असून, उपस्थितांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले.
 

Marathi Film Corporation Election  
जवळपास दशकभरानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक पार पडत असून, सुरुवातीपासूनच ही निवडणूक विविध वादांमुळे चर्चेत राहिली आहे. कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मतदानाची टक्केवारीही कमी राहिली. राज्यभरात अवघे 49.90 टक्के मतदान नोंदविण्यात आले.महामंडळाच्या 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 14 जागांसाठी 44 उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. मावळते अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनल, सतीश रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील चित्रकर्मी पॅनल तसेच 16 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
 
 
रविवारी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे मतदान प्रक्रिया पार पडली. कोल्हापूर केंद्रावर 746 पैकी 517 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर पुण्यात 724 पैकी 460 मतदारांनी मतदान केले. मतदानाच्या टक्केवारीच्या दृष्टीने कोल्हापूर केंद्राचा प्रतिसाद सर्वाधिक समाधानकारक राहिल्याचे चित्र दिसून आले. मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया कोल्हापुरातील राम गणेश गडकरी सभागृहात पार पडत आहे.या निवडणुकीत अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि पार्श्वगायक आनंद शिंदे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज, राजकीय हस्तक्षेप आणि गटबाजी यांसारख्या मुद्द्यांवरून मोठा वाद निर्माण झाला होता.
 
 
अभिनेते विजय पाटकर Marathi Film Corporation Election  यांनी निवडणूक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. काही व्यक्तींनी राजकारण करून आपला उमेदवारी अर्ज भरू दिला नसल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच एका मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याकडून मतदारांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. चित्रपट क्षेत्रातील निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.दरम्यान, अभिनेत्री नीलम शिर्के यांच्या उमेदवारीवरूनही वाद निर्माण झाला होता. अखेर अभिनेत्री वर्षा उसगावकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने आपण माघार घेत असल्याचे पत्रक नीलम शिर्के यांनी प्रसिद्ध केले होते.
अशा पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रावर उघडकीस आलेल्या अंधश्रद्धेच्या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेभोवतीचे वाद आणि चर्चांना आणखी खतपाणी मिळाले आहे. आता मतमोजणीच्या निकालाकडे चित्रपटसृष्टीसह संपूर्ण मराठी कलाविश्वाचे लक्ष लागून राहिले आहे.