नागपूर,
A pledge for cleanliness in Ramnagar शहर स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिका आणि नागपूर गार्डन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रामनगर परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा उपक्रम संघ मैदानातील ग्रीन जिम आणि परिसरात आयोजित करण्यात आला.स्वच्छता मोहिमेदरम्यान परिसरात विखुरलेल्या प्लास्टिक व काचेच्या बाटल्या तसेच अन्य कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचाही प्रयत्न यावेळी करण्यात आला.

या उपक्रमात स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी, नागपूर गार्डन क्लबच्या अध्यक्षा अनुजा परचुरे, सचिव समित आदमने तसेच क्लबचे सदस्य सहभागी झाले. रामनगर परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.यावेळी शहरातील हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि वृक्षसंवर्धनासाठी पुढील उपक्रमांची रूपरेषाही जाहीर करण्यात आली. जपानी गार्डन चौक ते लॉ कॉलेज चौक या मार्गावरील रोड डिव्हायडरवरील झाडांची निगा राखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी आणि हरित क्षेत्र वाढविण्यासाठी नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.