तेहरान,
Alert from Indian Embassy इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. क्षेपणास्त्र हल्ले आणि लष्करी कारवायांच्या पार्श्वभूमीवर तेहरानस्थित भारतीय दूतावासाने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. सध्या इराणमध्ये असलेल्या भारतीयांनी उपलब्ध वाहतूक सुविधांचा वापर करून शक्य तितक्या लवकर देश सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती झपाट्याने बदलत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, इस्रायलकडून इराणमधील विविध भागांवर हवाई हल्ले झाल्याच्या वृत्तानंतर तेहरानसह अनेक शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. काही प्रमुख विमानतळांवरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आल्याने प्रवाशांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.दुसरीकडे, इराणकडूनही प्रत्युत्तरात्मक कारवाया सुरू असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विविध भागांत हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून सुरक्षा दलांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पश्चिम आशियातील वाढत्या अस्थिरतेमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाची चिंता वाढली आहे. भारतीय दूतावासाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माध्यमांमधूनच माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या परिस्थितीत भारतीयांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याची तयारी दूतावासाने दर्शविली आहे.