वर्धा,
sarpanch-association : जिल्ह्यातील सन २०२४-२५ च्या कार्यकाळातील विद्यमान ३१५ सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्य कार्यपालन अधिकार्यांकडून नियुक्तीचा आदेश काढून सरपंच संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांना सुपूर्द केला. सरपंच संघटनेच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. यामुळे सरपंच संघटनेच्या पदाधिकार्यांनी जिपसमोर विजयाचा जल्लोष केला.

१५ मे रोजी ग्रामविकास विभागाकडून ३१५ सरपंचांची प्रशासक म्हणून नियुती करण्याचे आदेश निघून सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून अंमलबजावणी होत नसल्याने संघटनेच्या वतीने धर्मेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या दालनात ३ तास ठिय्या दिला होता. त्यानंतर २६ मे रोजी मुंबई येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना प्रशासक नियुतीच्या न्यायालयाच्या निर्णयानुसार आदेश काढण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकार्यांना द्यावे, अशा आशयाचे निवेदन दिले. जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ मध्ये कार्यकाळ संपलेल्या ३१५ ग्रामपंचायतींनी वर्धा जिल्हा सरपंच संघटनेतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. १० एप्रिलला सुनावणी दरम्यान न्यायालयाने २० फेब्रुवारी २०२६ रोजीच्या परिपत्रकाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर संघटनेेने जिल्हा परिषदेपुढे उपोषण केले होते. यासंबधी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी आदेशासंबधी शासनाकडून मार्गदर्शक सूचना मागीतल्याचे सांगितले होते. १५ मे रोजी ग्रामविकास विभागाकडून मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर, रिट याचिकेसंदर्भातील आदेशांचे अवलोकन व्हावे. न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्यासाठी पुढील कारवाई करावी. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पत्र काढण्यात आले. मात्र, या पत्राची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने आजी-माजी सरपंचामध्ये रोष निर्माण झाला होता.
दरम्यान, संघटनेच्या पदाधिकार्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देऊन ३१५ सरपंचांच्या प्रशासक नियुतीच्या न्यायालयाच्या निर्णयानुसार आदेश काढण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकार्यांना द्यावे, या मागणीचे निवेदन दिले होते. अखेर सरपंच संघटनेच्या लढ्याला यश आले असून मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भोसले यांनी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांच्यासह उपस्थित पदाधिकार्यांना आदेशाचे पत्र दिले. यावेळी धर्मेंद्र राऊत, विलास नवघरे, उपाध्यक्ष राजेश सावरकर, मुरलीधर चौधरी, किर्ती सवई, संजय ढुमणे, संतोष सेलूकर, आदी उपस्थित होते.