बसचा भीषण अपघात दोन ठार

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
मुंबई
bus accident मुंबईतील दादर येथील प्लाझा टॉकीज परिसरात सोमवारी सकाळी बेस्ट बसचा भीषण अपघात घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. नियंत्रण सुटल्यामुळे घडलेल्या या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चारहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 

BEST bus accident Dadar 
मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टची 463 क्रमांकाची इलेक्ट्रिक बस धारावीकडून दादरच्या दिशेने येत होती. सकाळी सुमारे 9.30 वाजता प्लाझा सिनेमाजवळील वर्दळीच्या परिसरात बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर बसने पुढे असलेल्या एका ट्रेलरला धडक दिली आणि त्यानंतर रस्त्यावरील अन्य तीन ते चार वाहनांनाही जोरदार धडक बसली. या धडकेत एका दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून एक दुचाकी बसखाली आल्याचेही सांगितले जात आहे.अपघातानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. प्लाझा टॉकीज आणि आसपासचा परिसर सकाळपासूनच नागरिक, व्यापारी आणि नोकरदार वर्गाच्या वर्दळीमुळे गजबजलेला असतो. त्यामुळे अपघातामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.अपघातात जखमी झालेल्यांमध्ये रिषभ गुप्ता, सतीश वाघांब्रे आणि bus accident  महेश डोईफोडे यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, बेस्ट बस अपघातांची पुनरावृत्ती होत असल्याने चालकांचे प्रशिक्षण, मानसिक स्थिती आणि वेट-लीज पद्धतीतील बस व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या काही वर्षांत बेस्ट बस अपघातांचे प्रमाण आणि त्यातील मृत्यूंची संख्या लक्षणीय असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
या अपघातामुळे दादर परिसरातील वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती. पोलिस आणि वाहतूक विभागाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले असून पुढील तपास सुरू आहे.