ल्युमिनिसेंस सोसायटीच्या उपाध्यक्ष पदी डॉ. संजय ढोबळे

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Sanjay Dhoble राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभागप्रमुख व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे यांची राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ल्युमिनिसेंस सोसायटी ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाली आहे. त्यांच्या संशोधन क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानाची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.गेल्या ३३ वर्षांपासून डॉ. ढोबळे ल्युमिनिसेंस विषयावर संशोधन करत असून एलईडी, डिस्प्ले तंत्रज्ञान, कॅन्सर थेरपी, रेडिएशन डोसीमेट्री, नाईट व्हिजन लॅम्प, सोलर सेल कार्यक्षमता वाढविणे आणि फॉस्फर मटेरियल यांसारख्या अत्याधुनिक विषयांवर त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.
 

Sanjay Dhoble 
त्यांच्या मार्गदर्शनाखाली ८४ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून १०७२ संशोधन निबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच ३३ आंतरराष्ट्रीय पुस्तकांचे लेखन आणि १०३ पेटंटना मान्यता मिळवून देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या संशोधन कार्याला २२ हजारांहून अधिक सायटेशन्स प्राप्त झाले आहेत.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जागतिक वैज्ञानिकांच्या यादीत सलग सहा वर्षे टॉप २ टक्के संशोधकांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. संशोधनासाठी त्यांनी १४ देशांचा दौरा केला आहे.डॉ. ढोबळे यांना आर. पी. राव आंतरराष्ट्रीय पुरस्कार, रिसर्च एक्सलन्स अवॉर्ड, इंडिया टॉप फॅकल्टी रिसर्च अवॉर्डसह अनेक प्रतिष्ठित सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांच्या निवडीबद्दल कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, डॉ. अखिलेश पेशवे तसेच विद्यापीठातील सहकारी व संशोधन चमूने त्यांचे अभिनंदन केले आहे.ल्युमिनिसेंस क्षेत्रातील संशोधनाला नवी दिशा देणाऱ्या या निवडीमुळे नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठेत आणखी भर पडली आहे.