थिंपू/गुवाहाटी,
Earthquake causes a stir भूतानमध्ये रविवारी मध्यरात्री ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के ईशान्य भारतातील अनेक राज्यांबरोबरच नेपाळ, बांगलादेश आणि चीनच्या काही भागांमध्येही जाणवले. भूकंपामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस आणि अँड्रॉइड भूकंप सूचना प्रणालीच्या माहितीनुसार, भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री सुमारे ११.०६ वाजता भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू भूतानमधील पुनाखा परिसरात असल्याचे सांगण्यात आले आहे. हा केंद्रबिंदू आसामपासून सुमारे २५२ किलोमीटर अंतरावर होता.

भूकंपाचे धक्के आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य भारतातील इतर काही भागांत स्पष्टपणे जाणवले. अनेक ठिकाणी नागरिकांनी खबरदारी म्हणून घरे व इमारती तत्काळ रिकाम्या केल्या. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात नागरिकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या प्रतिक्रिया नोंदवल्या.सुदैवाने, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून संभाव्य परिणामांचा आढावा घेत आहेत.भूतान हा हिमालयीन भूकंपप्रवण पट्ट्यात मोडतो. भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या सततच्या हालचालींमुळे या प्रदेशात वारंवार भूकंप होतात. त्यामुळे या भागात भूकंपाचा धोका कायम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.