अनिल कांबळे
नागपूर,
Fraud case वन विभागात नोकरी लावून देण्यासह वन विभागाच्या कामाचे टेंडर काढून देण्याचे आमिष दाखवून १९ लोकांची ९२ लाख ४४ हजाराने फसवणूक केल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विवेक श्याम कांबळे (२९) चिंचवड, पुणे असे आरोपीचे नाव आहे. कोराडी मार्गावरील पांडे ले आऊट येथे राहणारे अंगद गुलाब खैरे (३९) यांचे मित्र बाबुराव यादव यांचे मिहान येथे डी. वाय. पाटील क्रिकेट अकादमी आहे. खैरे हे यादव यांना भेटण्यासाठी आणि क्रिकेट खेळण्यासाठी जात असत. तेथे विवेक कांबळे हा देखील क्रिकेट खेळण्यासाठी येत होता.
दरम्यान, खैरे आणि कांबळे यांची ओळख झाली. त्यावेळी विवेकने तो वन विभागात उच्च अधिकारी असून त्यांच्याकडे टेंडर हेडचे काम आहे. त्याने आपले ओळखपत्र सुद्धा दाखविले. वन विभागातील कामाचे कामाचे टेंडर लोकांना मिळवून देतो असे सांगितले. त्याची राहणीमान व ओळखपत्र पाहून खैरे यांचा त्याच्यावर विश्वास बसला. वन विभागाचे टेंडर मिळविण्यासाठी कंपनी स्थापन करावी लागेल. जीएसटी रजिस्टर्ड करावे लागेल असेही सांगितले. त्यानुसार खैरे यांनी दक्षिता इंटरप्रायजेस या नावाने कंपनी स्थापन केली. त्यावर विवेकने तुमची कंपनी वन विभागाची अधिकृत वेंडर नसल्याने त्यांच्या ओळखीचे साई इंटरप्रायजेसकडून खरेदी करावे लागेल व दुसऱ्या कंपनीला त्याचा पुरवठा करावे लागेल असेही सांगितले.
Fraud case विवेकने सांगितल्याप्रमाणे खैरे यांनी विवेकच्या खात्यावर ६ लाख ४४ हजार रुपये जमा केले. त्यानंतर विवेकने टेंडर मिळवून देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर खैरे यांचे फोोन देखील उचलणे बंद केले. खैरे यांनी वन विभागात चौकशी केली असता विवेक कांबळे नावाचा कुणीही व्यक्ती वन विभागात नोकरीला नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी साई इंटरप्रायजेसचे मालक नागेश उत्तेकर यांची भेट घेतली असता त्यांनी ६ लाख ४४ हजार रुपये विवेकच्या खात्यात वळते केल्याचे सांगितले. विवेकने नागेश उत्तेकर व त्यांचे मित्र आकाश हजारे यांनाही तो मेट्रोत अधिकारी असल्याचे सांगून टेंडरच्या नावाखाली त्यांच्याकडूनही पैसे घेतले होते. बाबुराव राऊत यांना सुद्धा त्यांच्या नातेवाईकाला नोकरी लावून देतो असे सांगून फसवणूक केली होती. १ ऑक्टोबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान विवेकने १९ जणांची ९२ लाख ४४ हजाराने फसविल्याचे लक्षात आले. याप्रकरणी खैरे यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.