गोंदिया,
gondia-news : जिल्ह्यातील देवरी येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. गोंदिया जिल्हाप्रमुख सोनू कुथे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत वाभाडे काढले. महायुतीमध्ये एकत्र असूनही भाजप कशा पद्धतीने जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहे. याचा कुथे यांनी जाहीर मंचावरून पाढाच वाचत आगामी काळात भाजपचा टांगा पलटी करण्याचा इशारा दिला. कुथे यांनी मित्र पक्षाविषयीच अशी भाषा वापरल्याने जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
देवरी येथे रविवारी 7 जून रोजी शिवसेना कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसंगी मंचावर आ. बच्चू कडू, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी मंत्री दिपक सावंत, विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे, माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार सहसराम कोरोटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी, कुथे यांनी आपल्या भाषणात भाजपकडून दुजाभाव आणि त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून भाजपला थेट आव्हान दिले. गोंदिया नगरपरिषदेत भाजपचे नगराध्यक्ष होते.
तिथे आम्ही साडेबारा हजार मते काढून भाजपच्या नगराध्यक्षाचा पत्ता कट करून दाखवल्याचे ते म्हणाले. येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये हे आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. पण साहेब मी आपल्याला शब्द देतो, आमच्याकडे दोन विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी आहे. आगामी काळात यांचा टांगा पलटी केल्याशिवाय आणि यांना धडा शिकवल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही असा शब्द आ. बच्चू कडू यांना दिला. व जर त्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, तर जिल्हा परिषदेत आम्ही त्यांचे बारा वाजवून दाखवू, अशा शब्दात वाभाळे काढले. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी भाजपविरोधात उगारलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीमधील मित्रपक्षांमधील अंतर्गत कलह आता टोकाला पोहोचल्याचे दिसत असून जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना पेव फुटले आहे.