कुंदन ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांचा मानसिक छळ व आर्थिक लूट

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
कठोर कारवाईची मागणी

श्रीक्षेत्र माहूर, 
Harassment of passengers by Kundan Travels माहूर ते पुणे दरम्यान प्रवासी वाहतुकीच्या नावाखाली काही खाजगी प्रवासी बस चालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट आणि मानसिक छळ होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. माहूर येथील ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे यांचे जावई व नातवाला कुंदन ट्रॅव्हल्सच्या कर्मचाèयांनी अपमानास्पद वागणूक देत जबरदस्तीने अतिरिक्त पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कपाटे यांनी सोमवार, 8 जून रोजी माहूर पोलिस ठाण्यात तक्रार करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
 
 
Travels
(संग्रहित छायाचित्र) 
 
 
तक्रारीनुसार, वसंत कपाटे यांचे जावई निलेश परणकर हे आपला 9 वर्षीय मुलगा मितांशसह रविवार, 7 जून रोजी माहूरहून पुण्याकडे निघाले होते. त्यांनी कुंदन ट्रॅव्हल्सची सिंगल सीट ऑनलाइन बुक करून त्यासाठी 2,100 रुपये भरले होते. मुलगा सोबत असल्याची पूर्वकल्पना आणि तोंडी करार झाल्यानंतर रात्री 8 वाजता ते बसमध्ये बसले. बस माहूरहून निघाल्यानंतर सुमारे 50 किमीवर पुसद येथे पोहोचली असता, बसच्या प्रतिनिधीने झोपेत असलेल्या निलेश भोपे यांना जागे करून मुलाबाबत वाद घालून सार्वजनिकरित्या अपमानित केले आणि त्यांच्याकडून अतिरिक्त 400 रुपये उकळले असा आरोप आहे.
 
 
Harassment of passengers by Kundan Travels  या घटनेनंतर चालक व वाहकांनी पुसद ते पुणे प्रवासादरम्यान बस कुठेही न थांबवल्याचे वास्तवही त्यात मांडले आहे. त्यामुळे बसमधील मुले, वृद्ध तसेच मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त प्रवाशांनी वारंवार विनंती करूनही नैसर्गिक विधीसाठी वाहन थांबविण्यात आले नाही. परिणामी अनेक प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे वास्तव त्यांनी आपल्या तक्रारीत कथन केले आहे. वसंत कपाटे यांनी आपल्या तक्रारीत शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. माहूर शहरातील मुख्य मार्गावर अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे अधिकृत वाहनतळ नसल्याने राष्ट्रीय महामार्ग व शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहने तासन्तास उभी करतात. काही दिवसांपूर्वी अशाच पार्किंगमुळे झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
 
 
याशिवाय, अधिकृत तिकीट दराव्यतिरिक्त प्रवाशांकडून अवैध वसुली केली जाते, तसेच क्षमता पूर्ण झाल्यानंतरही प्रवासी कोंबले जात असल्याची सत्यता कथन केली आहे. सुरक्षेच्या नियमांनुसार चालकाच्या आसनाजवळील जागा मोकळी ठेवणे आवश्यक असताना तेथेही प्रवासी बसवून अपघाताला निमंत्रण दिले जात असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या प्रती त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिल्या आहेत. या तक्रारीवर पोलिस व आरटीओ प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे माहूरकरांचे लक्ष लागले आहे.