दोन रेती ट्रॅक्टरसह 10 लाखांची जप्ती
पारवा,
Illegal sand theft घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस ठाण्यांतर्गत रामनगर येथील वाघाडी नदीपात्रातून बेकायदेशीर रेतीची चोरी आणि वाहतूक करणाèया वाळू माफियांवर महसूल व पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. घाटंजी तहसीलदारांच्या आदेशान्वये ग्राममहसूल अधिकारी पवन वराटे आणि श्रीकांत भेंडे गस्तीवर होते. याच दरम्यान पांढरकवडा विभागाचे आयपीएस उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल, उपनिरीक्षक प्रमोद घोटेकर, जमादार धीरज जानकर आणि सहायक उपनिरीक्षक सुरेश येलपुलवार यांच्या पथकाला शनिवारी रात्री 1 च्या सुमारास माहिती मिळाली की, रामनगर शिवारात वाघाडी नदीपात्रातून काहीजण रेेतीची चोरी करत आहेत.
(संग्रहित छायाचित्र)
Illegal sand theft या माहितीच्या आधारे दोन्ही विभागांच्या पथकांनी रात्री 2 च्या सुमारास वाघाडी नदीपात्रात छापा टाकला. यावेळी रेतीची अवैध वाहतूक करणारे चार इसम, दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईदरम्यान प्रत्येकी 5 लाख रुपये किंमतीचे 2 ट्रॅक्टर आणि 14,000 रुपयांची 2 ब्रास रेती, असा एकूण 10.14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पारवा पोलिसांनी बादल लचमा मेश्राम (वय 27), अभिजीत गणपत मडावी (वय 25), अनूप दिलीप खांडरे (वय 27) आणि संस्कृत राजेंद्र गोमासे (वय 25) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पारवा पोलिस ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनात देवानंद बन्सोड यांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास उपनिरीक्षक श्यामसुंदर रायके करीत आहेत. दोन्ही प्रशासनाने केलेल्या या धडक कारवाईने पारवा पोलिस ठाणे हद्दीतील रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.