तेल अवीव.
Iran-Israel conflict flares up पश्चिम आशियातील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला असून इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. रविवारी रात्री इराणने इस्रायलमधील विविध भागांवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानंतर इस्रायलनेही जोरदार प्रत्युत्तर देत इराणमधील अनेक लष्करी ठिकाणांवर हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. या घडामोडींमुळे संपूर्ण प्रदेशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.इराणकडून झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि संघर्ष वाढवू नये, असे आवाहन केले होते. मात्र, इस्रायलने हे आवाहन धुडकावून लावत इराणमधील रणनीतिक ठिकाणांना लक्ष्य केले. इस्रायली संरक्षण दलाने पश्चिम आणि मध्य इराणमधील अनेक लष्करी तळांवर कारवाई केल्याचा दावा केला आहे.

इस्रायली हल्ल्यानंतर इराणने राजधानी तेहरानसह महत्त्वाच्या भागांतील हवाई सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. संभाव्य पुढील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.दुसरीकडे, इस्रायलनेही आपल्या नागरिकांना सावध राहण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या असून रुग्णालयांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन संरक्षण यंत्रणा उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आली आहे.
या संघर्षाची ठिणगी लेबनॉनमधील घडामोडींमधून पडल्याचे मानले जात आहे. इस्रायलने बेरूत परिसरातील हिजबुल्लाशी संबंधित ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर इराणने तीव्र प्रतिक्रिया देत इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रत्युत्तरात्मक कारवाया सुरूच राहिल्या आहेत.अमेरिकेने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून संघर्ष वाढल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी इराणला पुन्हा चर्चेच्या मार्गावर येण्याचे आवाहन केले असून शांततेसाठी प्रयत्न सुरू ठेवण्याची भूमिका व्यक्त केली आहे. दरम्यान, दोन्ही देशांच्या आक्रमक भूमिकेमुळे पश्चिम आशियातील सुरक्षेचे वातावरण आणखी बिघडले असून व्यापक युद्धाचा धोका वाढल्याची चिंता आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त केली जात आहे.