सांतो दोमिंगो,
Jet fire in Dominican Republic डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये एका खाजगी जेटच्या भीषण अपघातात पायलट आणि को-पायलट यांचा मृत्यू झाला. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागत असताना ही दुर्घटना घडली. विमान धावपट्टीवर उतरताच नियंत्रणाबाहेर गेले, घसरत गवताळ भागात पोहोचले आणि काही क्षणांतच त्याला भीषण आग लागली.मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत नोंदणीकृत गल्फस्ट्रीम जी-२०० हे खाजगी जेट नियोजित उड्डाणावर होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमानाच्या यंत्रणेत गंभीर तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे पायलटच्या निदर्शनास आले. इंजिन किंवा हायड्रॉलिक प्रणालीमध्ये बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पायलटने तातडीने विमानतळावर परतण्याचा निर्णय घेतला.

विमानाने सुरक्षितपणे धावपट्टी गाठण्याचा प्रयत्न केला; मात्र लँडिंगदरम्यान ते जोरात आदळले आणि धावपट्टी ओलांडून बाहेर गेले. त्यानंतर विमानाला आग लागली. काही मिनिटांतच संपूर्ण जेट आगीच्या भक्षस्थानी पडले. या दुर्घटनेत विमानातील दोन्ही वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला.विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी विमानात कोणताही प्रवासी नव्हता. हे विमान काही प्रवाशांना घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अपघातानंतर विमानतळ परिसरात आपत्कालीन यंत्रणा तातडीने दाखल झाली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये विमानतळ परिसरातून काळ्या धुराचे प्रचंड लोट आकाशात उसळताना दिसत आहेत.